संगमनेर : गोरक्ष नेहे : संगमनेर नगरपालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्र.13 अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी महिलेसाठी राखीव होता. मात्र, या वेळीसुद्धा हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी, तसेच महिला खुला प्रवर्गा साठी राखीव झाला आहे. यावरून या प्रभागात आरक्षणात कुठलाही बदल न होता जैसे-थेच परिस्थिती राहिली आहे. प्रभाग क्र. 2 मागीलवेळी ओबीसीसाठी राखीव होता. मात्र, या वेळी हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आणि खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे. या प्रभागात एक अनुसूचित जाती, तर एक खुल्या प्रवर्गातील महिला असणार आहे. शहरातील उर्वरित सर्व प्रभागांमध्ये 50 टक्के महिला व 50 टक्के पुरुष असे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातून 14 महिला व 14 पुरुष नगरसेवक निवडले जाणार, हे मात्र तितकेच खरे.
संगमनेर नगर परिषदेच्या हद्दीत येणार्या एकूण 15 प्रभागांची अंतिम रचना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर लागलीच निवडणूक आयोगाने इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) जागा वगळून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षण सोडतींची मागील शुक्रवारी जिल्हाधिकार्यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली. दरम्यान, यानुसार सोमवारी सकाळी 11 वा. पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी शहरातील राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सोडती काढून संगमनेरात लागू असलेल्या अनुसूचित जातीच्या 2 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
नव्याने तयार करण्यात आलेल्या द्विसदस्यीय प्रभाग रचनेत शहरात सर्वात मोठा ठरलेल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शहरातील घोडेकर मळा, साईनगर, पंम्पींग स्टेशन, चौहानपूरा, जेधे कॉलनी, माधव चित्र मंदिर समोरील वसाहत व स्वामी समर्थ मंदिर या भागाचा समावेश असणारा हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. या जागेवर आता अनुसूचित जातीमधील महिला अथवा पुरुष कोणीही उभे राहू शकतील, तर 13 (ब) या दुसर्या जागेवर मात्र सर्वसाधारण गटातील महिलेला उमेदवारी करता येणार आहे.
अनुसूचित जाती गटातील दुसर्या जागेचे आरक्षण शहरातील सर्वात लहान असलेल्या प्रभाग 2 मधील (अ) गटाला मिळाले. या प्रभागात येणार्या ऑरेंज कॉर्नर, सुयोग सोसायटी, भरतनगर, स्वामी समर्थ नगर, सिद्धिविनायक सोसायटी या भागाचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रभाग आरक्षण सोडतीत अनुसूचित जातीच्या महिला गटासाठी राखीव झाला. त्यामुळे या प्रभागातून अनुचित महिला उभी राहील. याच प्रभागातील दुसरी जागा मात्र सर्वसाधारण गटासाठी खुली आहे. या दोन प्रभागांतील दोन जागांशिवाय उर्वरीत सर्व प्रभागात मिळून असलेल्या 28 जागा सर्वसाधारण गटासाठी खुल्या आहेत. यातील निम्म्या म्हणजे 14 जागा सर्वसाधारण महिला गटास आरक्षित असणार आहेत.
संगमनेर नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये झालेल्या आरक्षण सोडतीच्यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, भाजपचे शहराध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले, सरचिटणीस जावेद जहागीरदार, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, प्रसाद पवार, सोमनाथ कानकाटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत वामन, नितीन अभंग, किशोर पवार, किशोर टोकसे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आज आरक्षण सोडतींबाबत कोणाचा आक्षेप, हरकती अथवा सूचना असतील, तर 15 ते 21 जून या कालावधीत दाखल करता येतील. यानंतर विभागीय आयुक्तांकडून आरक्षण रचनेला मान्यता मिळाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून 1 जुलै रोजी या आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणार असल्याचे नगरपालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सांगितले.