अहमदनगर

नगर : नेवासामध्ये नगराध्यक्षपद खुले; अनेकांना डोहाळे

अमृता चौगुले

नेवासा : कैलास शिंदे : नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, यासाठी सोमवारी सदस्य आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये ओबीसी आरक्षण नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने अनेक जण लंगोट लावूनच निवडणुकीच्या तयारीत आहेत. यामुळे खुल्या प्रवर्गातील नगराध्यक्षपद अनेकांना खुणावू लागले आहे.

नव्याने नेवासा नगरपंचायत झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत गडाख गटाला बहूमत मिळाले होते; परंतु नगराध्यक्षापदाचा उमेदवार मुरकुटे गटाचा निवडून आल्याने गेल्या वेळेस नेवासकरांनी दोन्ही गटाला सत्तेत संधी दिली होती. सध्या नेवासा नगरपंचायत मंत्री गडाख गटाच्या ताब्यात आहे. आता, नेवासा नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. सदस्याचे आरक्षण जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत निवडणुकीची केवळ चर्चा होत होती. कोणीही इच्छुक आपआपले पत्ते ओपन करित नव्हते; परंतु सोमवारी सदस्य आरक्षण सोडत झाली. यानंतर चर्चा, कोणाला कोणता प्रभाग चांगला, ओबीसी नसल्याने कोणाला फटका असल्याने निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पूर्वी असलेलीच 17 प्रभाग संख्या असून, 22,618 मतदार संख्या आहे.

अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष होण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. 1 जुलै हरकती नंतरच खर्‍याअर्थाने नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीला हवा भरणार आहे. नेवासा नगरपंचायत निवडणूक आरक्षण सोडत आज (सोमवारी) नगर उपविभागिय अधिकारी श्रीनिवास अर्जून यांच्या उपस्थित नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अंबादास गर्कल यांनी आठ वर्षीय प्रतिक प्रताप कडपे याच्या हस्ते दोन चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार आरक्षण सोडती पार पडला.

कोणता परिसर कोणत्या प्रभागात

प्रभाग- दोनमध्ये तहसील परिसर, प्रभाग- सहामध्ये अहिल्यानगर, संभाजीनगर, प्रभाग – सातमध्ये गांधीनगर, चक्रनारायण वसाहत, प्रभाग – 13मध्ये धनगरगल्ली, नाईकवाडा मोहल्ला, प्रभाग – 14मध्ये पाकशाळा, राममंदिर, प्रभाग – 17मध्ये मारूतीनगर, रानमळा असे प्रभाग सोडतीत सर्वसाधारण झाले आहेत. या प्रभागात अटीतटीच्या व चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे.

नऊ महिला नगरसेविका

पूर्वी 3,5,11,15,व 16 प्रभाग सर्वसाधारणसाठी होते; आता हेच प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी महिलाराज राहणार आहे. बर्‍याच इच्छुकांना आता पत्नींना उमेदवारीसाठी गळ घालावी लागणार आहे. याठिकाणी महिला प्रभावी ठरणार आहेत. नगरपंचायतीमध्ये नऊ महिला नगरसेविका राहणार आहेत.

SCROLL FOR NEXT