नगर : शहरातील तारकपूर बसस्थानक ते राधाबाई काळे महिला महाविद्यालय रस्ता व नटराज हॉटेल ते एसटी वर्कशॉपपर्यंतच्या रस्त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली या दोन्ही रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राधाबाई काळे महाविद्यालयाकडे जाणार्या या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात जिल्हाभरातून महाविद्यालयीन विद्यार्थिनी ये-जा करतात.
खराब रस्त्यांमुळे विद्यार्थिनींना वाहतुकीसाठी मोठी कसरत करावी लागते. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणेे गरजेचे होते. त्याच बरोबर एसटी वर्कशॉप ते नटराज हॉटेल हा रस्ता औरंगाबाद महामार्गाला जोडणारा असल्यामुळे त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. नगर शहरातील नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रस्त्यांच्या कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून, जस-जसा निधी प्राप्त होईल, तस-तसे शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे आ. जगताप यांनी सांगितले.
शहर विकासाचे पन्नास वर्षांचे कायमस्वरूपीचे नियोजन करून विकास कामे सुरू केली आहेत. विकासकामांना निधीसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असल्याने, टप्प्याटप्प्याने विकास कामासाठी निधी प्राप्त होत आहे. जमिनी अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या लाईन, बंद पाईपलाईन गटार योजनांची कामे पूर्ण केल्यानंतर कायमस्वरूपी रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत, त्यानुसार शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा