राहुरी : पुढारी वृत्तसेवा : वाळू तस्करांची वाढलेली दहशत तर दुसरीकडे प्रशासनाचे संबंधितांना मिळणारे पाठबळ पाहता सर्वसामान्यांसाठी ही अडचण ठरत आहे. राहुरी तालुक्यात फोफावत चाललेल्या वाळू तस्करीला लगाम लावणार तरी कोण? असा प्रश्न संतापाने विचारला जात आहे.
राहुरी येथील मुळा व प्रवरा नदी पात्रामध्ये वाळू तस्करांनी आपले अड्डे निर्माण केले आहेत. तहसीलदार व महसूल प्रशासनासह पोलिसांवर वाळू तस्करांनी हल्ले केल्याच्या अनेक घटना राहुरीत घडल्या. यासह सर्वसामान्यांना पायदळी तुडविणे, शेतकर्यांच्या शेतातून वाळू वाहने पळविणे आदी प्रकार नित्याचेच आहे.
दरम्यान, दैनंदिन हजारो ब्रास वाळूचा उपसा करीत शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल लुटणार्या संबंधित वाळू तस्करांचा उद्रेक राहुरी परिसरात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. डिग्रस केटीवेअर लगत तर वाळू तस्करांनी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून नदी पात्रामध्ये खुलेआम वाळू उपसा करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे. डिग्रस केटीवेअर हद्दीतून महसूल, पोलिस व पाटबंधारे विभाग दैनंदिन ये-जा करतात. परंतु, सुरू असलेल्या दुष्कृत्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत पोलिस व महसूल प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर कारवाई होत नाही. परंतु, तक्रारदाराच्या नावाची चर्चा सर्वत्र होते.
याबाबत नेमके गौडबंगाल काय, हे समजेनासे झाले आहे. तर दुसरीकडे मुळा नदी पात्रातील बारागाव नांदूर, डिग्रस, देसवंडी, आरडगाव, मानोरी, तांदूळवाडी, कोंढवड या पट्ट्यांमध्ये वाळू तस्करांनी जागोजागी अड्डे तयार केले आहेत. एखाद्या जागेची खरेदी केल्याप्रमाणे नदी पात्रामध्ये वाळू तस्करांनी आपले बस्तान बसविलेले आहे.
वाळू उपसा करण्यासाठी 12 पासून ते 18 वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलांचा वापर नदी पात्रामध्ये सर्रासपणे सुरू आहे. राहुरी तालुका हा वाळू तस्करीचा अड्डा बनत चालला आहे. जिल्ह्यात वाळू तस्करांचे आगार बनलेल्या राहुरी तालुक्याला गुन्हेगारीची कीड वाळू धंद्यातून लागलेली आहे. ज्याकडे कट्टा तोच वाळू धंद्यातला पठ्ठा, असेच चित्र आहे. गावठी कट्ट्याच्या वापराने नदी पात्रालगतच्या शेतकर्यांवर दहशत निर्माण झाली आहे.
दुचाकी, चार वाहनांकडून दंड वसुली नगर- मनमाड महामार्गावर दुचाकी, चारचाकी वाहन चालकांकडून दंड वसुलीत पोलिसांनी आघाडी घेतली, परंतु संबंधित पोलिसांना नगर- मनमाड महामार्गावरून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे शेकडो वाहने दिसतच नसल्याचे चित्र आहे.
डिग्रस केटीवेअरमध्ये पाण्याचा साठा आहे. परंतु, तो साठा वाळू तस्करांसाठी वाळू उपशाला अडसर आहे. त्यामुळे पाण्यातून वाळू काढण्यासाठी पाणबुड्यांचा वापर वाळू तस्करांकडून डिग्रस हद्दीतून होत असल्याचे चित्र आहे.