अहमदनगर

रूईछत्तीशी : वनराईकडे पर्यटकांनी फिरविली पाठ

अमृता चौगुले

रूईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील वनराई पर्यटकांपासून सध्या दूर राहिली आहे. पाऊस लांबल्याने वनराई फुलली नाही. त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. पाऊस झाल्यानंतर वनराईतील अनेक झाडे, फुले बहरतात आणि पर्यटक या वनराईकडे जास्त आकर्षित होतात. गुंडेगाव येथील वनराईत अनेक प्रकारची औषधी फळझाडे असल्याने त्याची देखील भूरळ पर्यटकांना पडते. नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांच्या सरहद्दीवर हे वनक्षेत्र असल्याने या दोन्ही तालुक्यांतील अनेक पर्यटक येथे फोटोसेशन काढण्यासाठी येतात. अनेक शाळा, विद्यालयातील क्षेत्रभेटी, पर्यावरणीय शिबिरे आयोजित केली जातात.

या दिवसात चांगला पाऊस पडून गुंडेगाव प्रकाशझोतात येत असते. पण यंदा पाऊस नसल्याने पर्यटक फिरकले नाहीत. राळेगण, देऊळगाव, वाळकी, श्रीगोंदा तालुक्यातील कामठी, कोळगाव, घारगाव, कोथूळ या गावातील लोकांची वर्दी वनराईत पाहायला मिळते. गुंडेगावला नगर तालुक्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. लग्न समारंभ, वाढदिवस अशा अनेक कार्यक्रमाचे फोटोसेशन करण्यासाठी लोकांची झुंबड येथे पाहायला मिळते. संत तुकाराम महाराज वनग्राम पुरस्कार देखील या गावाला मिळाला आहे. जलयुक्त शिवार, संत गाडगेबाबा, ग्रामस्वच्छता अभियान, जलसमृद्धी योजना असे देखील पुरस्कार मिळाले आहेत. नगर तालुक्यात सर्वाधिक बंधारे या गावात बांधले असून, हिवरेबाजार पाठोपाठ या गावची ओळख विशेष बनली आहे.

गुंडेगावातील तरुणांची मोठी भूमिका

गुंडेगावच्या वनक्षेत्राची ओळख जिल्ह्यात आहे. येथील पर्यटन मनमुराद असल्याने गाव प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. हिवरेबाजारची दिशा घेऊन गावत विविध निसर्गोपयोगी उपक्रम राबविले जातात. गावातील तरूण विकासात मोठी भूमिका बजावत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT