अहमदनगर

सांगा, आम्ही शिकायचं कसं..? दरवाजे अन् खिडक्या तुटलेल्या; गळके छत!

Laxman Dhenge

नगर : पुढारी वृत्तसेवा : नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि दरवर्षीचा पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. मात्र जिल्ह्यातील 700 शाळाखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. दर वर्षी एप्रिलमध्येच दुरुस्तीसाठी मंजुरी मिळते, त्यानंतर दोन महिन्यांत दुरुस्तीची कामे होतात. अर्थात त्यासाठी जिल्हा नियोजनमधून तरतूदही केली जाते. मात्र या वर्षी आचारसंहिता सुरू असल्याने ना निधी आला, ना मंजुरी झाली. त्यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यात विद्यार्थ्यांनाही आचारसंहितेची झळ सोसावी लागणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या सुमारे 3500 शाळा आहेत. या शाळांतील काही वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची गरज असल्याने तसा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषदेकडे पाठविला जातो. जिल्हा नियोजनमधून दुरुस्तीसाठी दिलेल्या निधीतून ती कामे केली जातात. यामध्ये स्लॅब दुरुस्तीसह मोडकळीस आलेल्या खिडक्या, तुटलेले दरवाजे दुरुस्ती, फुटलेली फरशी बसवणे, गेटची कामे अशी विविध कामे घेतली जातात.

288 शाळाखोल्यांची आठ कोटींतून दुरुस्ती!

2023-24 या वर्षात शिक्षण विभागाने मागणी केल्याप्रमाणे 976 शाळा खोल्यांच्या दुरुस्तीची नितांत गरज असल्याचे पुढे आले होते. संबंधितांचे तसे प्रस्तावही प्राप्त झाले होते. मात्र जिल्हा नियोजनमधून दुरुस्तीसाठी 8 कोटींचीच तरतूद झाली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, कार्यकारी अभियंता राहुल वाळके आदींनी प्राधान्यक्रमानुसार 288 शाळा खोल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतली होती. ही कामे वेळेत पूर्ण झाल्याने पावसाळ्यात संबंधित शाळांची चिंता दूर झाली आहे. मात्र उर्वरित 688 शाळा खोल्या अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

दर वर्षी एप्रिलमध्येच होते नवीन मंजुरी!

दर वर्षी एप्रिलमध्ये शाळा खोल्यांच्या कामांच्या मंजुरी मिळते. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून तरतूदही केली जाते. मात्र या वर्षी आचारसंहिता असल्याने प्रशासकीय मंजुरी झालेली नाही, निधीची तरतूदही झालेली नाही. अजूनही जुलै 2024 पर्यंत आचारसंहिता सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षीही तरी पावसाळ्यापूर्वी खोल्या दुरुस्तीची कामे होण्याची आशा धूसर झाली आहे. परिणामी, या वर्षी विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही गळक्या किंवा मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांत जीव मुठीत धरून पावसाळ्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

शिक्षणाधिकार्‍यांकडून सूचना

  • निर्लेखनास पात्र वर्गखोल्यांचा वापर करू नका
  • निर्लेखन मंजूर, मात्र झाले नसल्यास संपर्क करा
  • जुन्या वर्ग खोल्या भिंती, छत पाहूनच वापर टाळावा
  • खराब वर्गखोल्या, झाडाखाली वर्ग भरवू नयेत
  • तर ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिरात वर्ग भरवा

अनेक वर्गखोल्या धोकादायक!

स्लॅब दुरुस्तीचे प्रस्ताव आलेल्या अनेक वर्गखोल्यात विद्यार्थी धडे घेत असल्याचे समजते. त्यामुळे पावसाळा आणि धोकादायक ठरू शकणार्‍या शाळा खोल्या लक्षात घेता संबंधित विद्यार्थ्यांना इतरत्र बसविण्याच्या सूचना करण्यात येणार असल्याचेही समजले आहे.

आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजनाबाबत गटशिक्षणाधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. ज्या वर्गखोल्यांची अवस्था धोकादायक आहे, तिथे वर्ग भरवू नये, अशा सूचना केल्या आहेत.

– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT