कपाशी बियाण्यांची चढ्या भावाने विक्री : एकास अटक

कपाशी बियाण्यांची चढ्या भावाने विक्री : एकास अटक

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : शहरात चढ्या भावाने विक्रीसाठी आणलेल्या बेकायदेशीर कपाशी बियाण्यांसह महेंद्र बबनराव कानडे यास बुधवारी (दि. 29) रात्री रंगेहाथ पकडले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पथकाने ही कारवाई केली असून, नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत कृषी अधिकारी प्रताप कोपनर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 29 रोजी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे यांनी मिळालेल्या माहितीवरून तालुक्यातील शेतकर्‍यांना अनधिकृतपणे व जादा दराने नेवासा खुर्द येथे बियाण्यांची विक्री होत असल्याने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे, कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, गुणनियंत्रण निरीक्षक गणेश अनारसे, प्रताप कोपनर यांनी दि. 29 रोजी रात्री 10 वा. नेवासा खुर्द येथील सदाशिव नगर येथे महेंद्र बबनराव कानडे यांच्या राहत्या घरी जाऊन मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने घरात तपासणी केली.

तसेच घरासमोरील चार चाकी वाहनातून (एम एच 14 सी के 8123) कपाशी बियाणे पाकिटे बाहेर काढली. यामध्ये कपाशी वाण एनबीसी 1111ची 48 पाकिटे, कपाशी वाण कबड्डी तुलसीची 35 पाकिटे, कपाशी वाण 7067 ची 26 पाकिटे, तसेच कांदा पिकाची 1 किलो वजनाचे एक पाकीट असे एकूण 109 कपाशी व एक कांदा पाकीट असा 94 हजार 176 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे बियाणे कोठून खरेदी केले, याबाबत विचारणा केली असता हे बियाणे अरिहंत शेतकरी सेवा केंद्राकडून खरेदी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यापैकी एकच बिल कानडेकडे आढळून आले.

तसेच या बियाण्याची विक्री जादा दराने करत असल्याचे त्यांनी पंचासमक्ष सांगितले. विक्री परवान्याबाबत विचारणा केली असता कानडे यांनी परवाना नसल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी महेंद्र बबनराव कानडे (सदाशिव नगर, नेवासा खुर्द) यांच्या विरुद्ध कापूस नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानडे यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिस करत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news