अहमदनगर

Nagar Accident : नगरमध्ये भीषण अपघातात सहा ठार

दिनेश चोरगे

टाकळी ढोकेश्वर, जि. नगर; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावर ढवळपुरी फाट्याजवळ एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर यांच्यात बुधवारी (दि. 24) पहाटे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन पारनेर तालुक्यातील, तिघे संगमनेर व एकजण पाथर्डी तालुक्यातील आहे. जखमींना मदत करताना बसचा पत्रा लागून एक तरुण जखमी झाला.

नीलेश रावसाहेब भोर (25, देसवडे), प्रकाश रावसाहेब थोरात (24, वारणवाडी, दोघे ता. पारनेर), अशोक चिमा केदार (35), जयवंत रामभाऊ पारधी (45), संतोष लक्ष्मण पारधी (35, तिघे जांबूत खुर्द, ता. संगमनेर), सचिन कांतिलाल मंडलेचा (40, टाकळी मानूर, ता. पाथर्डी) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सुयोग अंबादास अडसूळ (वय 25, रा. भनगडवाडी), देवेंद्र गणपत वाडेकर (27, रा. देसवडे, दोघे ता. पारनेर) व बद्रिनाथ विठ्ठल जगताप (45, रा. लोणी, ता. शिरूर कासार, जि. बीड) अशी जखमींची नावे आहेत. आळेफाटा ते नगरदरम्यान हिवरे कोरडा शिवारात ढवळपुरी फाट्यावर पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

घटनेची माहिती मिळतात सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अपघात नेमका कसा झाला…

रस्त्यावर उसाची ट्रॉली उलटून सर्व ऊस रस्त्यावर पडला होता. त्याच्यापुढे दुसरा ट्रॅक्टर पुढे लावून त्यातील मजूर मदत करत होते. रस्त्यावर एक कार उभी करून तिच्या हेडलॅम्पच्या उजेडात हे मदतकार्य सुरू होते. तसेच रस्त्यावरील अन्य वाहनांना दिशा दाखविण्यासाठी या कारच्या पार्किंग लाईटही सुरू होत्या. पहाटे तीनच्या सुमारास ठाण्याहून नगरकडे जाणारी एसटी बस तेथे आली. मात्र बसचालकाला रस्त्यावरील ट्रॅक्टर आणि कारचा अंदाज न आल्याने बसची ट्रॅक्टर व कारला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, तिन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT