अहमदनगर

कर्जत : एमआयडीसीचा प्रश्न शिवसेना सोडविणार : बाबुशेठ टायरवाले

अमृता चौगुले

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड एमआयडीसीचा प्रश्न शिवसेना सोडविणार असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला तसे लेखी पत्र देऊन आश्वासन दिले आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी दिली.
कर्जत येथे पाटेवाडी-खंडाळा परिसरामध्ये होत असलेल्या एमआयडीसीचा प्रश्न आता चांगला चिघळला आहे.

आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यामध्ये या प्रश्नावरून संघर्ष सुरू असतानाच, आता शिवसेनेने देखील यामध्ये उडी घेतली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी सांगितले की, हा प्रश्न शिवसेना सोडविणार असून, कर्जत-जामखेडमधील हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी एमआयडीसी ही होणारच आहे आणि ही फक्त आणि फक्त शिवसेनाच करणार आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

टायरवाले म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी एमआयडीसी व्हावी, यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ उद्योगमंत्री उदय सामंत यांना मुंबई येथे भेटले. यावेळी शिवसेनेचे सचिव संजय मोरे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख डॉ.शबनम इनामदार, कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख दीपक जंजिरे, कर्जतचे तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, जामखेडचे तालुकाप्रमुख कैलास माने, युवा सेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख मुस्तफा शेख, विद्यार्थी सेनेचे प्रमुख सागर पाटील, गणेश सुरवसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी स्वतः कर्जत येथे होत असलेल्या एमआयडीसीसाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आवश्यक असणार्‍या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. यामध्ये तब्बल बाराशे एकर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. त्याच्या माबदल्यात त्या ठिकाणच्या शेतकर्‍यांना पैसे देणे, यासह इतर अनेक बाबी अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत.

यामुळे त्या सर्व बाबींची पूर्तता करून उद्योगमंत्री सामंत यांच्याच उपस्थितीमध्ये कर्जत एमआयडीसीचा नारळ शिवसेनेच्या वतीने फोडण्यात येणार आहे. शिवसेना ही कायम युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या पक्ष आहे. आम्ही राजकारणापेक्षा समाजकारण करण्यावर भर देतो. मात्र, अशा पद्धतीने कोणी शिवसेनेची व त्यांच्या मंत्र्यांची बदनामी करू नये, असे टायरवाले यांनी सांगितले.

आ.पवार यांची राजकीय स्टंटबाजी

स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आमदार रोहित पवार याप्रश्नी स्टंटबाजी करत आहेत. त्यांनाही सर्व अडचणीची कल्पना आहे. परंतु, जाणीवपूर्वक स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेची व उद्योगमंत्री सामंत यांची बदनामी करण्यात येत आहे. यामध्ये जनतेची आणि युवकांची देखील दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप टायरवाले यांनी केला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT