अहमदनगर

राजूरच्या सरपंच पुष्पा निगळेंसह नवाळींचे सदस्यत्व कायम

अमृता चौगुले

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या राजुर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पुष्पाताई निगळे व ग्रामपंचायत सदस्य ओमकार नवाळी यांच्या सदस्यत्व अपात्रतेच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला नाशिक विभागाच्या अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी स्थगिती दिल्याने आ. डॉ. किरण लहामटे गटाला दिलासा मिळाला आहे. राजूर ग्रामपंचायतीची निवडणूक (दि. 19 सप्टेंबर 2022) रोजी झाली. पुष्पा निगळे सरपंचपदी निवडून आल्या. विद्यमान सरपंच पुष्पा निगळे व त्यांचे पती दत्तात्तय निगळे यांनी ग्रामपंचायतीची मालकी असलेल्या जागेवर अतिक्रमण करीत घर व ऑफिसचे बांधकाम केले, असा विवाद अर्ज राजूर येथील रहिवासी गणपत एकनाथ देशमुख यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (1) (ज-3) व 16 प्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता.

संबंधित बातम्या :

विद्यमान सरपंच यांनी अतिक्रमण केल्याने त्यांना सदस्यपदावर अपात्र ठरवावे, अशी मागणी देशमुख यांनी केली होती. या प्रकरणी अर्जदार गणपत देशमुख व सरपंच पुष्पा निगळे यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकार्‍यांनी 7 ऑगस्ट 2023 रोजी सुनावणी घेतली. यात अर्जदार गणपत देशमुख व सरपंच पुष्पा निगळे यांनी लेखी म्हणणे सादर केले. याकामी गटविकास अधिकार्‍यांनी आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार सरपंच पुष्पा निगळे यांनी अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्यामुळे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी राजूरच्या सरपंच पुष्पा दत्तात्रय निगळे यांना ग्रामपंचायत सदस्यपदी अपात्र ठरविले होते.

अपील अर्जासोबत दाखल गट विकास अधिकार्‍यांचा चौकशी अहवाल पाहता, वादांकित मिळकतीस विस्तार अधिकारी व उपअभियंता यांनी संयुक्त भेट दिली, परंतु राजुर गावाचा नगर भूमापन सर्वे झाल्याने भूमी अभिलेखकडुन स्थळ निरीक्षण व मोजणी केल्यानंतरच अतिक्रमण असल्याबाबत स्पष्ट होईल, असा चौकशी अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला. यामुळे अपिलार्थीचे अतिक्रमण निर्विवादपणे सिध्द झाल्याचे प्रथमदर्शनी आढळत नाही. त्यामुळे अपिलार्थी थेट सरपंच पदावर निवडुन आलेल्या लोक प्रतिनिधी आहेत. अशा महत्वाच्या पदावरील व्यक्तीस तत्काळ पदावरुन काम करण्यापासून परावृत्त करणे न्यायोचित होणार नाही. पुढील आदेशापावेतो स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश नाशिक विभागाच्या अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी काढला.

कुनिल सुभाष नवाळी यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (1) (ज-3) व 16 प्रमाणे जिल्हाधिकार्‍यांकडे ओंकार बाळासाहेब नवाळी यांच्या अतिक्रमणाबाबत अर्ज केला होता. या पार्श्वभूमीवर राजुर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पुष्पाताई निगळे व सदस्य ओमकार नवाळी यांच्या सदस्यत्व अपात्रतेच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला नाशिकचे अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी स्थगिती दिल्याने आ. डॉ. किरण लहामटे गटाला दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT