अहमदनगर

जामखेड : नागेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त नामसाप्ताहास प्रारंभ

अमृता चौगुले

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर यात्रेनिमित्त बुधवारी येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. सकाळी नागेश्वराची विधीवत पूजा करून विना पूजन करण्यात आले. यानंतर सप्ताहस प्रारंभ झाला. श्रावण शुद्ध पंचमीला (नागपंचमी) या ग्रामदेवतेची यात्रा असते. या उत्सवानिमित्त 16 ते 23 ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. बुधवारी सकाळी नागेश्वराची विधिवत पूजा करण्यात आली. नंतर विना पूजन करून भक्त व वारकर्‍यांच्या उपस्थितीत सप्ताहस प्रारंभ झाला.

यावेळी सप्ताह समितीचे, विनायक राऊत, सिताराम राळेभात, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, बाबासाहेब खराडे, संतोष बारगजे, दिलीपकुमार राजगुरू, हरिभाऊ बेलेकर, पंढरीनाथ महाराज राजगुरू, पांडुरंग भोसले, दिलीप निमोणकर, महादेव पानसाडे, बबन सूर्यवंशी, नंदू शिंदे, किरण सोनवणे, प्रशांत काळे, सचिन म्हेत्रे, नागेश्वर भजनी मंडळाचे दादासाहेब महाराज सातपुते, मृदंगाचार्य जगन्नाथ महाराज धर्माधिकारी (मेजर), शेषेराव मुरूमकर, त्र्यंबक वराट, मुरलीधर काळे, गिरधारीलाल ओझा, संतोष राळेभात पाटील, आप्पा वडेकर, इंदुबाई बारगजे आदी उपस्थित होत्या.

सप्ताहातील किर्तने

16 : ज्ञानेश्वरी महाराज बोराटे, जामखेड
17 : कैलास महाराज भोरे, देवदैठण
18 : हरि महाराज खुणे, पाथरूड
19 : अजिनाथ महाराज निकम, शेवगाव
20 : वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले
21 : जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज कुटे
22 : जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये,
23 : रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.

पालखी सोहळा सोमवारी

सोमवारी (दि. 21) सकाळी पालखी मिरवणूक होईल. ज्यांच्या संकल्पनेतून 2004 साली नागेश्वर पालखी सोहळा सुरू झाला ते यजमान संतोष बारगजे व सविता बारगजे यांच्या हस्ते 20 वर्षानंतर पुन्हा यावेळी नागेश्वराची विधिवत पूजा होईल. नंतर पालखीमध्ये नागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. टाळ मृदुंगाच्या गजरात, हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस प्रारंभ होईल. नागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, संविधान चौक, विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, शनि मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने नागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर आरती व महाप्रसाद होईल. दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.

मंदिराची आख्यायिका

जामखेड -खर्डा रस्त्यावर वैतरणा नदीतीरावर नागेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. शके 1144 मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले असल्याचा उल्लेख येथे आहे. त्या काळातील शास्त्रयुक्तपद्धतीने केलेले दगडी काम आजही सुस्थितीत आहे. उत्तराभिमूख असलेल्या मंदिरातील गाभार्‍यात काळी पाषाणाची पिंड आहे. पिंडीवर भगवान शंकराचा मुखवटा व नागाचा फडा आहे. समोर नंदी व पितळी भव्य त्रिशूळ आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला औदुंबर व उजव्या बाजूला पुरातन काळातील काही साधूंच्या समाधी आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT