अहमदनगर

येरे…येरे…पावसा..! शेतकर्‍यांच्या आभाळाकडे नजरा

अमृता चौगुले

मिरजगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांनी पावसाच्या अपेक्षेवर मोठे धाडस करून खरीप हंगामाची तयारी केली. मोठ्या प्रमाणात पेरणी केली; मात्र परेणीनंतर पावसाने दांडी मारली. अद्यापही परिसरात मोठा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी हवालदिल आहे. येत्या चार-आठ दिवसांत पाऊस पडला नाही, तर दुबार पेरणीचे संकट उभे राहाते की, काय अशी भीती आहे.

कर्जत तालुक्यात अद्याप पावसाने हजेरी लावली नाही; मात्र मिरजगाव परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीला एक पाऊस झाला. यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली. बियाणे व खतांसाठी खर्च झाला; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे उगवलेली पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस येण्याची शक्यता अद्याप दिसत नाही, पावसासाठी बळीराजा प्रार्थना करत आहे.

मिरजगाव परिसरात शेतकरी कपाशीचे पिक मोठ्या प्रमाणावर घेत होते. मात्र, मजुरांच्या टंचाईमुळे कापाशीचे क्षेत्र कमी झाले. मका, तूर, उडीद, फळबागाकडे शेतकर्‍यांचा कल आहे. पावसा अभावी शेतातील पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या चार-आठ दिवसांत पाऊस आला नाही, तर पिके जळून जातात की, काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस झाला नाही यामुळे पाणी पातळी वाढली नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पिके डोळ्या देखत सुकू लागलेने पाणी देणार तरी कसे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

मिरजगाव मंडळात लागवडीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
बाजरी – 1274, मका – 4195, कपाशी – 3453, मूग – 52, तूर – 4962, उडीद – 1547, ऊस – 2765, फळबागा – 1206, कांदा 667, भाजीपाला – 384, चारापिके व इतर – 1863.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT