आयुष्याच्या रंगमंचावर जीवनाचाच ‘तमाशा’; कलावंतांना जिवंतपणीच मरण यातना

आयुष्याच्या रंगमंचावर जीवनाचाच ‘तमाशा’; कलावंतांना जिवंतपणीच मरण यातना

नेवासा(अहमदनगर) : महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख कानाकोपर्‍यात आहे. ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजनाचे प्रमुख साधन म्हणून 'तमाशा'कडे पहिले जाते. मात्र, तमाशा कलावंतांना एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्री सारखे ग्लॅमर नाही मिळत. हीच या लोककलावंताची डावी बाजू आहे. आयुष्यभर प्रेक्षकांना खळखळून हसविताना आपल्या दु:खाची रेषाही चेहर्‍यावर येऊ न देता रंगमंचावर रुबाबदार आणि विनोदी कलावंत म्हणून अवघ्या महाराष्ट्रात ओळख निर्माण केलेली असते.

मात्र, आज ही कला आणि त्यातील कलावंतांच्या जीवनाचा 'तमाशा'च झाला आहे. जोपर्यंत हातपाय चालतात, तोपर्यंतच उपजिविका चालते, हातपाय थकले की, या कलाकारांना जिवंतपणीच मरणयातना सोसण्याची वेळ येते. हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे आपला शेवटचा अत्यंसंस्कार कोण करेल? या विवंचनेत हा कलाकार आयुष्यभर चिंतेत जगतो. जीवनाच्या या रंगमंचावर हे कलाकार हारत चालंले आहेत. आपले दुख: प्रेक्षकांना न दाखविता हा कलाकार कलेच्या अविष्कारात दंग होवून जातो; मात्र हेही तितकेच खरे. अशाच एका जोडप्या कलाकार कुटुंबाने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून समाजापुढे एक आदर्शच निर्माण केला आहे.

तमाशा कलावंत हा विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर घेवून प्रेक्षकांना हसत फिरणार्‍या या कलावंताचे पडद्यामागील वेदनेचा कोण विचार करणार? म्हातारपणी या कलावंतांचे बे – हाल होत असताना या कलावंतांना राज्य शासनाकडून मानधनही मिळते; मात्र ते सुद्धा काही मोजक्याच लोकांना, मग बाकीच्या कलावंतांना जीवंतपणी मरण यातना सोसणण्याची वेळ येवून ठेपते. याबाबत शासनदरबारी योग्य उपाययोजना आखण्याची खरी गरज असल्याचे कलावंतांमधून बोलले जात आहे.

चौगुले दाम्पत्याचा देहदानाचा संकल्प

नियाज चौगुले स्वत: तमाशा कलावंत व सिने कलाकार असून, आता ते सेवाश्रमाच्या सेवाकार्यात पूर्णवेळ सामाजिक कार्यात आहेत. सपत्नीक मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प त्यांनी केला. जीवनात दुखा:चा डोंगर उभा असतांनाही रंगमंचावर प्रेक्षकांना खिळखिळून हसविणारा हा कलावंत आपले जीवन जगून दुसर्‍याला आनंद देण्याचा प्रयत्न करतांना दिसतो, अशा या कलावंताना शासनाच्या मानधनासाठी सामाजिक संस्थेने पुढाकार घेवून मदतीचा हातभार लावण्याची खरी गरज आहे.

मुलांचीही होते परवड

तमाशा कलावंताची ही मुले शिक्षणापासून दूर राहातात. परिणामी गुन्हेगारी क्षेत्राकडेही न कळत वळतात, या मुलांना हक्काचे घर असावे, शिक्षणाबरोबर चांगले संस्कार त्यांना मिळावेत, या हेतूने सुरेश राजहंस व मयुरी राजहंस यांनी 2011पासून ब्रम्हनाथ येळंब (ता.शिरूर, जि. बीड) येथे या संस्थेची स्थापना केली.

वंचित घटकासाठी 'सेवाश्रम'

छत्रपती संभाजीनगर येथे सेवाश्रम हा वंचित घटकातील तमाशा कलावंत, कैकाडी, घिसाडी, वडारी, तसेच पाल ठोकून व्यवसाय करणार्‍या बांधवांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी धडपडणार्‍या कार्यकर्त्यांचा परिवार उभा केलेला. या मुलांना प्रवाहात आणून त्यांना मोकळ्या आकाशात उत्तुंग झेपवण्यासाठी बळ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथे केला जातो.

जीवनात तमाशा कलावंत म्हणून प्रेक्षकांची सेवा केली. आता, त्यांच्या मुलांसाठी झगडत आहे. हे करताना मी आणि पत्नीने मरणोत्तर देहनाचा संकल्प केला. आमच्या देहावरही इतरांचा अभ्यास व्हावा, अशीच आमची शेवटची इच्छा.

– नियाज चौगुले, संध्या सातपुते-चौगुले, कलावंत

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news