सिंहगडावर लवकरच ऑनलाइन टोल वसुली

सिंहगडावर लवकरच ऑनलाइन टोल वसुली

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्यावर वाहनाने जाणार्‍या पर्यटकांना उपद्रव शुल्काचे (टोल) पन्नास, शंभर रुपये रोख देताना गैरसोय होत असल्याने वन विभागाने आता ऑनलाइन टोल वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत पर्यटकांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. दरम्यान, रविवारी सुटीच्या दिवशी सिंहगडासह राजगड, तोरणा गडावरील पर्यटकांची संख्या रोडवल्याचे चित्र दिसून आले. श्रावण महिना सुरू झाल्याने पर्यटक धार्मिक स्थळांना भेटी देण्यास पसंती देतात. त्यामुळे सिंहगडासह इतर किल्ल्यांवर नेहमीपेक्षा पर्यटकांची संख्या सध्या कमी झाली आहे. गेल्या रविवारच्या तुलनेत आज (दि.20) जवळपास चाळीस टक्के पर्यटकांची संख्या कमी होती. दिवसभरात गडावर 926 दुचाकी, 400 चारचाकी वाहने आल्याची नोंद झाली. खडकवासला धरण चौपाटी, तसेच पानशेत धरण परिसरात पर्यटकांची नेहमीप्रमाणे वर्दळ होती.

ऑनलाईन टोल वसुलीबाबत पुणे (भांबुर्डा) वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले, 'उपद्रव शुल्क सुरू झाल्यापासून रोख पैसे घेतले जात आहेत. पर्यटक, तसेच स्थानिक नागरिकांनी मागणी केल्याने ऑनलाइन शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित बँकेला पत्र दिले आहे. आगामी दोन दिवसांत आवश्यक त्या उपाययोजना करून ऑनलाईन टोल वसुली सुरू करण्यात येणार आहे. यापुढे रोखीने टोल वसुली करण्यात येणार नाही.'

राजगडावरील धोकादायक तळे बंद
गेल्या रविवारी राजगड किल्ल्यावरील पद्मावती माचीवरील तळ्यात पडून पर्यटकाचा मृत्यू झाला होता. पावसामुळे शेवाळे साठून तळ्याच्या पायर्‍या, कठडे निसरडे झाले आहेत. धोकादायक तळे मृत्यूचा सापळा बनवल्याने पुरातत्त्व विभागाने लोखंडी पत्रे, लाकडे लावून हे तळे बंद केले आहे. पुरातत्त्व विभागाचे पाहरेकरी बापू साबळे म्हणाले, की पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक तळे बंद करण्यात आले आहे. पाण्यासाठी शेजारचे तळे खुले आहे. दरम्यान, दिवसभरात राजगडावर 800, तर तोरणाडावर 500 पेक्षा अधिक पर्यटकांनी हजेरी लावली.

वाहतूक कोंडी सुटण्यास होणार मदत
सिंहगडावर जाणार्‍या दुचाकीसाठी पन्नास, तर चारचाकी वाहनासाठी शंभर रुपये उपद्रव शुल्क आकारले जाते.
डोणजे, गोळेवाडी व कोंढणपूर फाटा टोल नाक्यावर पर्यटकांकडून उपद्रव शुल्क वसुली केली जाते.
सुटे पैसे नसल्यामुळे अनेक पर्यटकांचा खोळंबा होऊन अनेकदा वाहनांच्या लांब रांगा लागतात.
ऑनलाइन पेमेंटमुळे टोल वसुली सुलभ होऊन वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news