नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील जखणगाव येथील शेतकरी जयसिंग मोरे यांच्या शेळीवर बिबट्याने बुढव रात्री एक वाजता हल्ला करून मारून टाकली आणि तिच्या कासेचा भाग फस्त करून बिबट्या निवांतपणे पसार झाला. हिंगणगाव परिसरातील बिबट्याचा वनखात्याने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी केली आहे.
हिंगणगाव-जखणगाव रस्त्यावर जयसिंग मोरे यांची वस्ती आहे. उसाचे वाढते क्षेत्रामुळे हिंगणगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे या अगोदर गेले वर्षभर सातत्याने वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी हिंगणगावचे सरपंच तथा सरपंच परिषद अहमदनगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी वारंवार केली आहे.
वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले. बिबट्याने मोरे यांच्या घरापासून वीस ते पंचवीस फुटांवरच शेळी ओढून फस्त करण्याचा प्रयत्न केला. घरातील लोकांना बिबट्या व शेळीच्या आवाजामुळे जाग आली. सर्व लाईट चालू केले असता, बिबट्या घराजवळच बसुन शेळी खात होता त्याला पाहताच घरातील महिला बेशुद्ध पडली.
इतरांनी गडबडीत शेतातील ढेकूळ मारून बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्या दाद देत नव्हता.शेळीचे रक्त पिऊन कासेचा भाग खाल्ल्यावर बिबट्या निवांत शेतात निघून गेला.घरातील महिला बेशुद्ध पडल्यावर घरच्यांची तारांबळ झाली. बिबट्याला पिटाळून लावायचे की बाईला दवाखान्यात न्यायचे, असा पेच या कुटुंबावर रात्री उभा राहिला होता.
या घटनेचा पंचनामा डॉक्टर मुकुंद राजळे, वन विभागाचे कर्मचारी श्री.येणारे यांनी केले. यावेळी हिंगणगाव सरपंच आबासाहेब सोनवणे,दत्तू शेठ सोनवणे,उपसरपंच मुकुंद दुबे,जयसिंग मोरे,बबई मोरे, निसार पठाण,दीपक मोरे,विजय मोरे,जर्हाड,सचिन मोरे हजर होते.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.