करंजी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर जावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी आई-वडील अहोरात्र काबाडकष्ट करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील आई-वडिलांच्या कष्टाचा विचार करून त्यांचे स्वप्न साकारावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयात शनिवारी पालक-शिक्षक व विद्यार्थी मेळावा झाला.अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय म्हस्के होते. यावेळी पोलिस निरीक्षक मुटकुळे बोलत होते.
मुटकुळे म्हणाले, तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याची गरज आहे. कमी वयात मुले व्यसनाच्या आहारी जाऊ लागले आहेत, ही चिंतेची बाब आहे. दूरवरून येणार्या मुलांकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. परंतु मोठ्या किमतीचा मोबाईल विद्यार्थ्यांना देण्याची गरज नाही. त्याचबरोबर आई-वडिलांनी दररोज मुलाचा मोबाईल तपासला पाहिजे. विद्यालयात मुलींना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतील, तर त्वरित आम्हाला किंवा शाळेला नावे कळवा. संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल.
शाळा परिसरात फिरणार्या टारगटांचा बंदबस्त केला जाईल. विद्यार्थी व तरुणांनी सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा. चुकीचे मेसेज इतरांना फॉरवर्ड करू नये. बाहेरगावाहून येणार्या विद्यार्थ्यांचे एसटी बसअभावी गैरसोय होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, याकडे युवा नेते विवेक मोरे यांनी लक्ष वेधले. सरपंच राजेंद्र पाठक यांचेही भाषण झाले.
यावेळी सरपंच विलास टेमकर, माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे, भाऊसाहेब क्षेत्रे,जालिंदर वामन, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद राजगुरू, नामदेवराव मुखेकर, देवीदास शिंदे, माजी उपसरपंच रमेश अकोलकर, राहुल अकोलकर, माजी सैनिक राजेंद्र अकोलकर, उपसरपंच नवनाथ आरोळे उपस्थित होते. प्रा.श्रीकांत अकोलकर यांनी आभार मानले.
हेही वाचा