पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम किनारपट्टीवरील कोकण, गोवा येथील काही विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची अधिक शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने आज (दि.२७) सकाळी दिली. तसेच महाराष्ट्रीतील अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता (Rainfall Activity) देखील वर्तवली आहे.
देशाच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांत पावसाने गेल्या काही दिवसांपासून कहर केला आहे. तर देशातील उर्वरित राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान मागील दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे.
पश्चिम मान्सून सध्या हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहे. मान्सूनचा हा पट्टा हळूहळू गोरखपूर, पाटणा, मलाड, पूर्वेकडील मणिपूर, दक्षिण आसामच्या भागाकडे सरकरत आहे. त्यामुळे पुढच्या आठवडाभरात उत्तरेतील मान्सून कमी होईल आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून, पुढे मान्सून दक्षिणेकडे सरकेल असेही हवामान विभागाने रविवारी दिलेल्या बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे.
दोन दिवस हवामान विभागाकडून बहुतांश ईशान्यकडील राज्यांना भारतात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शनिवारच्या बुलेटीननुसार, रविवारी (दि.२७) ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता (Rainfall Forecast) आहे. दरम्यान, ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेशातील विविध भागात अति मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख दहा वर्षांपूर्वी एक सप्टेंबर होती. पण दिवसेंदिवस मान्सून हा लहरी होत असल्याने त्याच्या तारखा देखील बदलत आहेत. मान्सूनचा परतीचा प्रवास जवळ आला आहे. यंदा तो 17 सप्टेंबर रोजीच पूर्व राजस्थानातून निघेल. महाराष्ट्रातून ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. मागच्या वर्षी 2022 मध्ये तो २० सप्टेंबर रोजी राजस्थानातून तर २० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला निघाला होता, असेही हवान विभागाए म्हटले आहे.