ऑस्ट्रेलियात फ्रेममागे आढळला कार्पेट अजगर | पुढारी

ऑस्ट्रेलियात फ्रेममागे आढळला कार्पेट अजगर

सिडनी : अजगर देखील पृथ्वीतलावरील सर्वात भीतीदायक श्रेणीत मोडणारे. एरव्ही घनदाट परिसरातच अजगराचा अधिक वावर असतो आणि ते साहजिकही आहे. पण काहीवेळा अगदी आलिशान अपार्टमेंटमध्ये जर असा अजगर आढळून आला तर ते निश्चितच धक्का देणारे असेल. ऑस्ट्रेलियात लिव्हिंग रूममधील फोटो फ्रेममागे कार्पेट अजगर आढळून आला आणि घरातील कुटुंबीयांना यामुळे जबरदस्त धक्का बसला.

सनशाईन कोस्ट स्नेक कॅचर्स या सर्प पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडणार्‍या ग्रूपने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. डॅन रम्से या सर्पमित्राने हा व्हिडीओ शेअर करताना आर्टवर्क फ्रेम तिथून काढल्यानंतर अजगराची सुटका करता आली, असे नमूद केले. फ्रेममागील अजगराची सुरक्षित सुटका करणे अतिशय कठीण होते. शिवाय मला ती हातातील फ्रेम खालीही आदळू द्यायची नव्हती. यामुळे मी एका बाजूने फ्रेम व्यवस्थित हाताळत अजगराला पकडले. त्याला व्यवस्थित पकडल्यानंतर सुरक्षित ठिकाणी सोडणे शक्य झाले आणि मलाही दिलासा मिळाला, असे डॅनने या व्हिडीओत पुढे नमूद केले. हा व्हिडीओ पोस्ट करताच तो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत राहिला.

कार्पेट अजगर हा बिनविषारी असून तो ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व न्यू जिनिया येथेच अधिक आढळतो. या अजगराला दात असत नाहीत. पण तिरक्या सुळ्याच्या सहाय्याने सावज पकडण्यात हा अजगर तरबेज असतो.

Back to top button