नगर : पुढारी वृत्तसेवा
शिक्षक बँकेतील सत्ताधारी दोन्ही गट आता एकमेकांवर आरोप करत आहेत. मात्र, यांची भांडणं फक्त लोकांना दाखवण्यापुरतीच आहेत. प्रत्यक्षात चुकीचा कारभार होत असताना संचालक मंडळाच्या बैठकीत कुणीही प्रोसेडिंगवर विरोध दर्शविला नाही. त्यामुळे बँकेतील या कारभाराला रोहोकले-तांबे दोन्ही गट जबाबदार आहेत. शिक्षक सभासदांच्या हितासाठी आगामी बँकेची निवडणूक आपण स्वबळावर लढणार असल्याची भूमिका गुरुकुल मंडळाचे नेते डॉ. संजय कळमकर यांनी 'पुढारी'शी बोलताना मांडली.
विकास मंडळाची सत्ता प्रारंभी गुरुमाउलीकडे आली. त्यापूर्वी सदिच्छाकडे होती. त्यांनी इमारत बांधायचे ठरवले. मात्र, त्यांना विरोध झाला. त्यानंतर रोहोकलेंनी पुढाकार घेतला. त्यासाठी दहा-दहा हजार रुपये सभासदांनी आवाहन केले. मात्र, काहींनी सभेत विरोध केला. गुरुमाऊलीच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी दिली. त्यातून बांधकाम केले. पहिला मजला सध्या अपूर्ण आहे. नंतर काम बंद पडले. कळमकर यांनी सत्ताधार्यांना सगळ्या मंडळांची एक कमिटी नियुक्त करा, जिल्ह्यातून पैसे उपलब्ध करू, असे सुचविले होते.
कळमकर यांनी 12 कोटी रुपये जमा करून देण्याची जबाबदारी उचलली होती. मात्र, सत्ताधार्यांनी ते ऐकले नाही. त्यांचा अहंकार आडवा आला. आम्हीच करू असे म्हणून त्यांनी इतराना विश्वासात घेतले नाही. परिणामी आज काम बंद पडल्याचा आरोप संजय कळमकर यांनी केला.
सत्ताधारी रोहोकले व तांबे गटाने केलेली घड्याळ खरेदी. नोटाबंदीच्या काळात रात्रीही सुरू असलेल्या मुख्य शाखेचे गौडबंगाल, राहुरी शाखेतून नगरला कॅश नेताना अर्धीच रक्कम चोरी कशी झाली, सातत्याने चेअरमन बदली करून एकमेकांचे पाप झाकले, मीटिंग भत्ता घेणे, एकमेकांवर आरोप करणारे, विरोध दाखवणारे प्रोसेडिंगवर मात्र सह्या करून संमती देतात, अशी अनेक मुद्दे निवडणुकीत गाजणार आहेत.
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करणार. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि छावणी परिसरातील शाळेतील मुलांसाठी मोफत आरोग्य सुविधा, शिक्षकांसाठी माफक दरात आरोग्य सेवा आणि सेवानिवृत्त शिक्षकांना अल्पदरात सुविधा पुरविणार, व्यावसायिक गाळे शिक्षकांच्या मुलांसाठी दिली जातील, सभासदांना एक लाख रुपयांचे क्रेडिट कार्ड दिले जाईल.
शिक्षक बँकेतील 11 हजार सभासदांपैकी 4500 हजार सभासद मतदार हे गुरुकुल मंडळाला मानणारे आहेत. त्यांचे या निवडणुकीत मोठे योगदान असणार आहेत. याशिवाय अन्य निर्णायक मतेही आमच्यासाठी अनुकूल असल्याचा दावा 'गुरुकुल'मंडळाने केला आहे.
निवडणूक जाहीर झाल्यावर सगळ्या संघटनांच्या प्रमुखांना व्यक्तीवर बोलायचे नाही, खालच्या पातळीवर बोलायचे नाही, धोरणांवर बोलायचे असे सांगणार आहे. सर्व मंडळांकडून तसे लेखी घेतले जाईल. ते जिल्ह्यात फिरवले जाईल. त्यानंतरही याचे कोणी उल्लंघन केल्यास त्याला शिक्षक मते देणार नाहीत, अशी आचारसंहिताच तयार करण्याचा मानस आहे.
-डॉ. संजय कळमकर, गुरूकुल मंडळाचे नेते.