अहमदनगर

अहमदनगर : एक कोटीच्या देयकाबाबत पोखरणांसह कर्मचारी रडारवर

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा रुग्णालयातील 27 कोटींची कोरोना औषध खरेदी संशयाच्या भोवर्‍यात सापडली असतानाच, आता शस्त्रक्रियागृह उभारणीतही मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता दस्तुरखुद्द आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनीच चौकशी अहवालातून व्यक्त केली आहे. याप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह अन्य काही कर्मचारी प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.

याबाबतची माहिती अशी, की आंतरराष्ट्रीय मानवाधिकार रक्षक संघटनेचे सिद्धार्थ शिसोदे यांनी जिल्हा रुग्णालय आणि तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची दखल घेऊन शासनाने चौकशी लावली होती. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. त्याच समितीने आपला अहवाल 23 जून 2023 रोजी नाशिक विभागाचे आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांना सादर केला आहे.

दरम्यान, या अहवालात अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. यामध्ये चौकशी समितीसमोर तक्रारदार हजर होते, तर डॉ. पोखरणा उपस्थित राहिले नाहीत. कार्यादेश निगर्मित केल्यानंतर दस्तावेजाचे अवलोकन केले असता 26 मार्च 2021 रोजी 5 कोटींची देयके कोषागारात सादर केली. यातून 10 लाख टीडीएस वजा जाता 3 कोटी 80 लाख रुपये ठेकेदार आनंद केमिकल्स, पुणे यांना अदा केले.

तसेच 1 कोटी 10 लाख रुपये आहरण व संवितरण अधिकारी यांच्या नावावर घेण्यात आल्याचे दिसून येते. नियमाप्रमाणे पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम संबंधित संस्थेला, व्यक्तीला त्यांच्या नावावर ऑनलाईन देणे अपेक्षित आहे. मात्र यात तसे झाले नसल्याचा ठपका अहवालात ठेवला आहे.

अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे काम 29 मार्च 2022 रोजी पूर्ण केल्याचा दाखला दिलेला आहे. काम पूर्ण होण्यापूर्वीच 3 कोटी 80 लाख रुपये मे.आनंद केमिकल्स कंपनीला अदा करण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांच्या नावे घेतलेली उर्वरित रक्कम 1 कोटी 10 लाख रुपये ठेकेदारास अदा केले, याबाबतचा बँक खात्याचा तपशील चौकशी समितीला सादर केलेला नाही.
दरम्यान, या प्रकरणातील जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांना प्रशासकीय नोटिसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्याच्याही सूचना डॉ. अहिरे यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला केल्याचे समजले आहे.

यंत्रसामग्री पुरवठ्यात तफावत

याशिवाय ई निविदेमध्ये नमूद केलेली यंत्रसामग्री व प्रत्यक्ष पुरवठा केलेली यंत्रसामग्री यामध्ये तफावत आढळून येत आहे. काही साहित्य अदलाबदल केल्याचे दस्तावेजावरून दिसून येत आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता अहवालातून व्यक्त करण्यात आलेली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT