अहमदनगर

श्रीरामपूर : पाण्याअभावी रब्बीचे संकटही शेतकर्‍यांच्या माथी !

अमृता चौगुले

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेतकरी वर्गाचा खरीप यंदा पूर्णपणे पावसाअभावी मातीत गेला आहे. पाण्याची पातळी शिल्लक राहिली नसल्याने भविष्यात रब्बीचे संकट कायम राहणार असून, दिवाळीला दिवा लावण्यासही कापूस राहणार नाही. शिवाय गेली दोन वर्षांपासून शेतकरी वर्गासाठी सुवर्णमध्ये ठरलेले सोयाबीन पाण्यावाचून शेवटच्या घटका मोजत आहे. शेतकरी वर्गानी आजमितीस पाऊसा बरोबर शासनाकडून आर्थिक मदतीच्या बुस्टरडोसची अपेक्षा लागली आहे. तरच खचलेल्या शेतकरी वर्गास उभारी मिळणार आहे. नाहीतर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी वर्ग मोडून पडणार आहे.

भर पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने डोळ्यासमोर पीक रोज जळत आहे. हजारो, लाखो रुपये खर्च करून शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पिकासाठी मेहनत घेतली. पर्यायी बँक, सेवा सोसायटी, खासगी लोण सोने-नाणी गहाण ठेवत पदरमोड केली. उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या औषधे, रासायनिक खतांचा वापर केला आहे.

मात्र पावसाने सुरवाती पासूनच ठेंगा दाखवल्याने आजची शेतातील पिकाची परिस्थिती पाहता आता मात्र पोटात गोळा उठला आहे. ज्या भरवशावर आर्थिक व्यवहार केले, ते परत फेडायचे कसे? या विचाराने ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची झोप उडाली आहे. त्यातच बहुतेक शेतकरी वर्गाचा शेतीला जोड व्यवसाय म्हणून केलेल्या दूध व्यवसायाला गेल्या सहा महिन्यांपासून दूध दराचे ग्रहण लागले आहे. त्याला ही सामोरे जात असताना आता मात्र चारा पिकांचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनला आहे.

जनावरांना हिरवा चारा शिल्लक नसल्याने दूध उत्पादन क्षमतेत त्याचा विपरीत परिणाम होत असून, त्याचा थेट परिणाम रोजच्या लागणार्‍या अर्थकारणावर होत असल्याने व्यवहार ठप्प होत आहे.चोहोबाजूंनी शेतकरी निसर्गाच्या कचाट्यात सापडला असल्याने त्याला आता शासनाच्या भरीव मदतीतीची गरज आहे.

चारा छावणीची शेतकर्‍यांना गरज

कोविड महामारी नंतर अनेक तरुण पशुपालन व्यवसायात उतरले आहे. परिणामी पशुधनाची संख्या वाढली आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने रोजच्या लागणार्‍या चार्‍याचा प्रश्न गंभीर समस्या झाली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेत चारा छावणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

आता फक्त चिंतेचे ढग…!

उगवले ते उन्हाने करपले..शेतकरी वर्गाच्या कोणत्याच पिकाला हमीभाव नाही.महागाई चा वणवा रोज पेटत आहे.खर्च करणे थांबत नाही.रोजचा दिवस उगवतो तसाच मावळतो पावसाचा थेंबही पडत नाही.पशूधन व कुटुंबकबिला चालवयाची कशी अश्या अनेक विचारत सध्या बळीराजा असून ,डोळ्यासमोर फक्त चिंतेचे ढग दिसत आहे.तरी मायबाप सरकारने याचा गांभीर्याने विचार करून भरघोस मदत जाहीर करावी, अशी मनोमन विनवणी करत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT