अहमदनगर

कर्जतमध्ये होणार भक्तनिवास; आमदार रोहित पवारांकडून शब्दाची पूर्तता

अमृता चौगुले

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या कर्जत नगरीचे आराध्य दैवत संत श्री सद्गुरू गोदड महाराज यांच्या भक्त निवासाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. आमदार पवार यांनी मविआ सरकार असताना नगरविकास विभागाकडे भक्त निवासाबाबतचा प्रस्ताव देत, वेळोवेळी पाठपुरावा केला. महाविकास आघाडी सरकारने पाच कोटींचा निधी या भक्तनिवासासाठी मंजूर केला होता. परंतु, राज्यातील सत्ता बदलानंतर नव्या सरकारने त्यास स्थगिती दिली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती उठल्यानंतर या कामाचे भूमिपूजन पार पडले आहे. कर्जत नगरपंचायत निवडणुकीवेळी आमदार पवार यांनी भक्तनिवासाची इमारत उभारली जाईल, असा शब्द जनतेला दिला होता. या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त हभप समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पवार यांच्यासह अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील मंडळी, गोदड महाराजांचे भक्तगण, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इमारतीत ग्रंथ संग्रहालय होणार

बाहेर गावचे भाविक, महंत व धार्मिक गुरू यांना राहण्याची व्यवस्था, गरजूंसाठी छोटेखानी विवाह समारंभ, जेवणाची व्यवस्था भक्तनिवास इमारतीत असणार आहे. गोदड महाराजांच्या प्राचीन ग्रंथांच्या संग्रहालयासाठी इमारतीत जागा देण्यात येणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT