अहमदनगर

Dada Patil College : नॅक मानांकनामध्ये दादा पाटील महाविद्यालयाची उत्तुंग भरारी; देशात सहावे तर पुण्यात पहिल्या क्रमांकावर

अमृता चौगुले

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनात बाजी मारली असून अ ++ श्रेणी प्राप्त करीत असताना 3.71 सीजीपीए घेऊन भारतात सहावा, महाराष्ट्रात तिसरा, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दादा पाटील महाविद्यालयाच्या नॅकच्या चौथ्या फेरीच्या मानांकनाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद करत महाविद्यालयाने अ++ हे मानांकन मिळविले. निकाल जाहीर होताच कर्जत शहरात प्रचंड जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतशबाजी, गुलालाची उधळण करीत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रांगणात डीजे लावून जल्लोष केला. प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी, रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी या सर्वांनीच नाचून, गुलाल उधळून आनंद साजरा केला. प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सर्वांचे अभिनंदन करत महाविद्यालयाला हीरक महोत्सवी वर्षांत मिळालेले हे यश कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

संस्थेचे सहसचिव डॉ. ज्ञानदेव मस्के, ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालयाने विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार रोहित पवार, जनरल बॉडीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य बप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे व सर्व सदस्य, सर्व सामाजिक संघटना, नगरपंचायत, तालुका पत्रकार संघ, रोटरी क्लब यांनी प्राचार्य डॉ.नगरकर, नॅक समन्वयक डॉ. संदीप पै, नॅक सहाय्यक डॉ.संतोष घंगाळे व सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन केले.

नॅकच्या चौथ्या फेरीच्या मूल्यांकनासाठी 17 व 18 ऑगस्ट रोजी नॅक चेअरमन म्हणून उत्तराखंड येथील एच. एन. गढवाल विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. देवेंद्रसिंग नेगी, प्रमुख समन्वयक म्हणून सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हरियाणाचे प्रा.डॉ. संजीव कुमार व सदस्य म्हणून केरळ येथील इव्हेनियस कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. के. आय. जॉर्जी या नॅक पिअर टीमने भेट दिली. नॅक मूल्यांकनात महाविद्यालयाचे बदललेले स्वरूप व गुणात्मक दर्जा याची तपासणी करताना, तज्ज्ञ समितीने बोलकी झाडे, आयडियाचा आविष्कार, तेजस्विनी महोत्सव, रयत परा मिलिटरी विभाग, एनसीसी, एनएसएस, पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, फॅशन डिझाइनिंग, योगा व मेडिटेशन, ब्युटी अँड वेलनेस, उपहारगृह, लेकीचे झाड उपक्रमातील सहभाग, विद्यार्थ्यांना सर्व थरातून केली जाणारी मदत, देखण्या व सुसज्ज इमारती, शारदाबाई पवार सभागृह, इनडोअर स्टेडिअम, सायन्स लॅब, ईटीपी प्लॅन, गांडूळ खत प्रकल्प, मुलींचे वसतिगृह, कर्मवीर भाऊराव पाटील ग्रंथालय, आदि विविध विभाग तसेच सामाजिक विस्तार कार्य, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमातील सहभाग अशा उपक्रमांचे मूल्यमापन केले होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT