पेठवडगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : पालकमंत्री केसरकर | पुढारी

पेठवडगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : पालकमंत्री केसरकर

किणी – पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या पेठवडगाव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, यासाठी टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पेठवडगाव येथे बोलताना केली. स्मारकासाठी एक कोटी व अंतर्गत रस्त्यांसाठी दोन कोटी रुपये निधी जाहीर केला.

वडगाव नगरपरिषदेची विकास आढावा बैठक पालकमंत्री दीपक केसरकर, खा. धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार कल्पना ढवळे, जिल्हा सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. मंगलधाम येथे झालेल्या या बैठकीवेळी विविध प्रलंबित प्रश्नावर निर्णय घेण्यात आले. पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण करताना भुयारी गटार योजनेसाठी ८५ कोटी, धनाजी जाधव यांच्या स्मारक विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ८ कोटी रु. इनडोअर स्टेडियमसाठी ४ कोटी रु. मागणी केली.

खा. माने यांनी यावेळी बोलताना वाहतुकीच्या गैरसोयीमुळे वडगाव शहराचा श्‍वास गुदमरतोय. त्यामुळे शहरास रींगरोडची गरज आहे, असे सांगितले. माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी पेठवडगाव स्वतंत्र तालुका व्हावा, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७०० घरांच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी. पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात मटण व मच्छी मार्केटसाठी जागा मिळावी. वडगाव येथे प्रस्तावित असलेले रजिस्टर ऑफिस मंजूर व्हावे, अशी मागणी केली.

माजी उपनगराध्यक्ष डॉ. अशोक चौगुले यांनी महालक्ष्मी तलावात जाणारे पाणी नागरिकीकरण व औद्योगिकरणामुळे दुषित होणार आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याने यासाठी उपाययोजना करावी, अशी सूचना केली. यावर बोलताना पालकमंत्री केसरकर यांनी भारताच्या नकाशावर जसे जयपूरचे जे स्थान आहे तसे स्थान कोल्हापूरचे व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असून समाधीस्थळे व स्मारके कोल्हापूरचे वैभव असल्याचे सांगितले.

सुरू असलेल्या धनाजी जाधव स्मारकासाठी १ कोटी, महालक्ष्मी मंदिरासाठी २५ लाख, देण्याचे जाहीर करून शहराच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सर्व समस्यावर मार्ग काढला जाईल असे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र माने, प्रविता सालपे, अजय थोरात, रंगराव पाटील, सुनीता पोळ, सुकमार पाटील, संतोष चव्हाण, रणजित पाटील, विकास कांबळे, अक्षय मदणे, भीमराव साठे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री केसरकर यांच्या आगमानपूर्वी चौकातच मराठा समाजातील डॉ. अभय यादव,संतोष ताईंगडे यांनी लाठीमार करणाऱ्या शासनाचा जाहीर निषेध करणारा फलक घेऊन निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जमावबंदीचे कारण देत मज्जाव केला. याविरोधात डॉ. यादव व काईगडे यांनी रस्त्यावरच बैठक मारली. मात्र पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांनी त्यांची समजूत काढत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सांगितले. पालकमंत्र्यांचे आगमन होताच चौकातच निवेदन देण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या.

 

 

Back to top button