अहमदनगर

शेवगाव : थेंबथेंब पावसाने पिके जेमतेम; उत्पन्नात घट होण्याची भीती

अमृता चौगुले

शेवगाव तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : यंदा निसर्गाचे कालचक्र फिरले असून, थेंबथेंब पावसाने पिके जेमतेम आली आहेत. आता, उत्पन्नातही घट होणार आहे. याचा अंदाज आल्याने खरीप का रब्बी, या निर्णयाच्या चिंतेत शेतकरी हबकला आहे. पावसाअभावी वाढ खुंटलेल्या पिकांवर ढगाळ हवामानाने किडरोगांचा प्रार्दुभाव वाढला आहे. पुढे जोरदार पाऊस झाला तरी पिकांना फारसा फायदा होणार नाही. तर, जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी पिक विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले. याचा अर्धा पावसाळा संपला तरीही जोरदार पाऊस झाला नसल्याने काळी माती तहाणलेली राहिली आहे. गतवर्षी अतिवृष्टीने तर यंदा पाऊस नसल्याने पिकांची वाताहात झाली. यंदा खरीप पेरणीला थोडासा विलंब झाला असला, तरी त्या प्रमाणात पिकांची वाढ झालेली नाही. मात्र, शेतकर्‍यांची अपेक्षा कधी थांबत नसते त्यामुळे मेहनती थांबल्या नाहीत. कर्ज आज ना उद्या फिटेल; पंरतु काळ्या माईची ओटी रिकामी असता कामा नये, अशी सतत श्रद्धा बाळगणारा शेतकरी भरभरून दे ग आई ही प्रार्थना करण्यास कधी विसरत नाही.

उत्पन्न होवो अथवा न होवो आपला पिढीजात शेती व्यवसायास खर्च करण्यास बळी गेला तरीही बळीराजाने कधी आखडता हात घेतला नाही. औंदा अशीच काहीशी परिस्थिती उद्भवली आहे. ढगाकडे पाहता पाहता दोन महिने सरत आले तरीही धो-धो पावस बरसला नसल्याने परिणामी पिकांची वाढ खुंटली. त्यात आलेल्या पिकांवर ढगाळ हवामानाने रसशोषक किडीचा प्रार्दुभाव झाला आहे.

त्यात पिक वाढीसाठी खतांची मात्रा देण्यास अडचण होत आहे. पेरणी झालेले दिवस व संपणारे पोषक वातावरण पाहता पिकांचे बाळसे संपत आल्याने, आता पिकांची अपेक्षेप्रमाणे वाढ होणार नसल्याने उत्पन्नात घट होणार, असा निष्कर्ष काढला जात आहे. शेतकर्‍यांना कसेच सुखाचे दिवस नसतात तो निसर्गाच्या कालचक्राखाली दबलेला आहे. शेतीप्रधान देशात कोणतेच शासन त्याचा फारसा विचार करत नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधक फक्त त्याचे भांडवल करतात. यात वाजली तर वाजली नाहीतर एवढाच त्यांचा उद्देश आहे.

56 हजार 222 हेक्टर क्षेत्रात पेरणी

तालुक्यात खरीप हंगामाचे 52 हजार हेक्टर उद्दिष्ट होते; मात्र 56 हजार 222 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यात 42 हजार 361 क्षेत्रात कपाशीची लागवड झाली, तूर सात हजार 310 हेक्टर, बाजरी एक हजार 493 हेक्टर व इतर क्षेत्रात मका, मूग पिके आहेत.
सध्या ही पिके जमिनीशी खेळत असून, हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात पावसाचा अंदाज वर्तविला असून पिक राहणार की वाहून जाणार याचीही भीती शेतकर्‍यांमध्ये आहे.

  • 1 रुपयात पीक विमा आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपल्या पिकांचा विमा भरण्याचे आवाहन.
  • तालुका कृषी अधिकारी ए.एस टकले व पं.स. कृषी अधिकारी राहूल कदम यांनी केले.

टॉमेटोचे भाव वाढले अन् काहींना चिंता

टॉमेटोचे भाव वाढले याची काहींना चिंता; मात्र याआधी भाव नसल्याने हेच टॉमेटो शेतकर्‍यांना फेकून द्यावे लागले, याचा विचार होत नाही. कपाशी, कांदा पिकांस मिळालेला भाव पाहता निवडणूका नसल्याने यास दरवाढ व्हावी यासाठी आंदोलने करण्यास कोणी धजावले नाही. गतवर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान अद्याप अनेक शेतकर्‍यांना मिळाले नाही. याचा सारासार विचार करता फक्त कामापुरताच शेतकरी समोर येतोे, इतरवेळी मात्र तो वार्‍यावर असतो.

तालुक्यातील पाच वर्षांतील सरासरी पाऊस

तालुक्यात 551.10 मि.मि. पावसाची सरासरी आहे. 2018 -19मध्ये 74 टक्के, 2019 -20 मध्ये 140 टक्के, 2021- 22मध्ये 216 टक्के, 2021 -22मध्ये 159 टक्के, तर 2022 – 23मध्ये 136 टक्के पाऊस झाल्याची नोंद.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT