अहमदनगर

केदारेश्वर कारखान्याची उभारणी; ढाकणेंचा धाडसी निर्णय: खा. शरद पवार

अमृता चौगुले

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी तालुका सतत दुष्काळी, पाणी नाही, ऊस नाही, अशा परिस्थितीत बबनराव ढाकणे यांनी केदारेश्वर सहकारी साखर कारखाना जिद्दीने उभा करून चालवला. कारखाना उभा करण्याचा त्यानी धाडसी निर्णय घेतला, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील 'संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे' केदारेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर 30 केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी आणि इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. खासदार पवार म्हणाले, साडेपाच लाख मेट्रिक टन गाळप करून इतिहास घडवल्याबद्दल त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांचे अभिनंदन केले.

श्रीरापूर, कोपरगाव, बारामती येथे गुळाची बाजारपेठ होती. त्यानंतर खासगी साखर कारखाने निघाले; परंतु अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी देशातला पहिला सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर स्व. मारुतराव घुले, बाबुराव तनपुरे आणि इतरांनी सहकारी कारखाने काढले.

बबनराव ढाकणे यांनी केदारेश्वरची यशस्वी निर्मिती केली. केदारेश्वरने हाती घेतलेला डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प कारखान्याच्या हिताचा व परिसराच्या वैभवात भर टाकणारा आहे. कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना वरदान ठरेल. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी विचार मांडले.

यावेळी आमदार नीलेश लंके, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार भानुदास मुरकुटे, नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रभावती ढाकणे, हर्षदा काकडे, शिवशंकर राजळे, बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक कोलते, शिवसेनेचे शशिकांत गाडे, राम अंधारे, रमेश गर्जे आदी उपस्थित होते. तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी स्वागत केल. अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट यांनी आभार मानले.

जिल्हा बँकेने मदत न केल्याची खंत : ढाकणे

बबनराव ढाकणे म्हणाले, राज्यात 100 हून जास्त कारखाने पवारांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिले. पवारांचा व माझा 48 वर्षांचा संबध राहिला असून, मला त्यांचे सतत मार्गदर्शन मिळाले. सध्या चांगल्या वाईट चर्चेत पवारांचे नाव येते. लालकृष्ण अडवाणी पंतप्रधानांच्या शर्यतीत असताना मोदी पंतप्रधान झाले, ही पवारांची खेळी आहे, अशी चर्चा रंगली होती.आमचे आयुष्य कमी होऊन, ते पवारांना मिळावे, असेही ढाकणे म्हणाले. जिल्हा सहकारी बँकेने कारखान्याला कधीही आर्थिक मदत दिली नाही, अशी खंत ढाकणे यांनी व्यक्त केली.

ढाकणे पिता-पुत्र भावनिक

ढाकणे म्हणाले, मी आजपर्यंत जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केला. त्यामुळे माझे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले. मुले, नातवंडांना वेळ दिला नाही, तरी माझा संघर्षाचा वारसा माझा मुलगा प्रतापने समर्थपणे घेतला. त्याने केदारेश्वर यशस्वी चालून दाखविला. त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्या समोर त्याचे कौतूक करतो, असे म्हणत असताना ढाकणे आणि अ‍ॅड. प्रताप ढाकणे दोघेही भावनिक झाले. दोघांनाही आश्रू आनावर झाले. स्टेजवरच प्रताप ढाकणे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT