Lok Sabha Election 2024 
अहमदनगर

उमेदवारीसाठी आवश्यक पंचविशी पूर्ण : 26 एप्रिल रोजी छाननीची डेडलाईन

Laxman Dhenge

नगर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवणुकीत अहमदनगर व शिर्डी या दोन मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होण्यास 18 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी 26 एप्रिल रोजी होणार आहे. 25 वर्षे पूर्ण असणार्‍या उमेदवारांचेच अर्ज वैध ठरणार आहेत. अहमदनगर व शिर्डी मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या शेकड्यात असण्याची शक्यता आहे. 18 एप्रिलपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. 25 एप्रिल उमेदवारी हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी 25 वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीला उमेदवारी अर्ज दाखल करता येतो. लोकसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी दिनी 26 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराचे वय 25 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 25 वर्षे वय पूर्ण नसल्याने शंकरराव गडाख यांना इच्छा असूनही निवडणूक लढविता आली नव्हती. उमेदवारी अर्जासोबत 25 हजार रुपये अनामत रक्कम भरून त्याची पावती जोडावी लागणार आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. प्रत्येक उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. सदर बँक खाते स्वत:च्या नावे किंवा उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांच्या नावे संयुक्त खाते उघडावे लागणार आहे. मात्र, हे खाते अर्ज दाखल करण्यापूर्वी किमान एक दिवस अगोदर उघडावे लागणार आहे.

मतदारयादीत नावनोंदणी आवश्यक

जास्तीत जास्त दोन मतदारसंघांतून उमेदवारी करण्यास मुभा आहे. उमेदवार इतर जिल्ह्यांतील अथवा इतर मतदारसंघातील असेल तर त्याने उमेदवारी अर्जासोबत संबंधित मतदारनोंदणी अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसाठी एक तर उर्वरित उमेदवारांना प्रत्येकी 10 सूचक आवश्यक आहेत. मात्र, सूचक त्याच मतदारसंघातील मतदार असणे आवश्यक आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT