अहमदनगर

Nagar Rain news : कोसेगव्हाण परिसरामध्ये ढगफुटी? शेकडो एकर पिकांचे नुकसान

अमृता चौगुले

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील कोसेगव्हाण परिसरात सोमवारी (दि.25) रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शेकडो एकर पिकांचे नुकसान झाले. घरांच्या भिंती पडून तिघे जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. चांडगाव येथेही एक वृद्ध पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. दरम्यान, तालुक्यात इतर ठिकाणीही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः आढळगाव, हिरडगाव, टाकळी लोणार, कोकणगाव, भावडी, कोळगाव या भागात पावसाने छोट्या मोठ्या तलावात पाणी आले आहे. सोमवारी रात्री दहा ते साडेअकराच्या दरम्यान कोसेगव्हाण येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.

संबंधित बातम्या :

या पावसाने कोसेगव्हाण येथील जवळपास सर्व तलाव भरून वाहू लागले. उडीद, मका, कापूस यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. परिणामी या पिकांचे पूर्ण नुकसान होणार आहे. दिगंबर शिंदे यांची एक हजार डाळिंबाची झाडे पाण्याखाली गेल्याने त्यांचे जवळपास वीस लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

जोरदार पावसामुळे कोसेगव्हाण येथील काही घरांची पडझड झाली. यामध्ये सुनंदा हंबीरराव नलगे (वय 73), सुचिता लालासाहेब शिंदे (वय 50) व शुभम लालासाहेब शिंदे (वय 26) हे तिघे जखमी झाले आहेत. यातील सुनंदा नलगे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. चांडगाव परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. नदी ओलांडून जात असताना एक वृद्ध पुरात वाहून गेला असल्याची माहिती आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत शोध कार्य सुरू होते. दिवसभर पाऊस सुरू असल्याने बहुतेक भागातील खरीप पिके वाया जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वीस लाख रूपयांचे नुकसान
कोसेगव्हाण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी दिगंबर शिंदे यांच्या डाळिंबाच्या बागेचे 20 लाखांचे नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टातून उभा केलेली बाग एका पावसात संपून गेली. या भागातील नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नुकसान भरपाई मिळावी
परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. घरांच्या पडझडीत काही लोक जखमी झाले आहेत. त्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी उपसरपंच भीमराव नलगे यांनी केली.

पंचनामे सुरू : तहसीलदार कुलथे
ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे, घरांची पडझड झाली आहे, त्या भागात कामगार तलाठी व कृषी सहायक याना संयुक्तरित्या पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळविला जाईल, असे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी सांगितले.

कर्जत रस्त्यावरील वाहतूक बंद
दरम्यान, तालुक्यातील हिरडगाव भागातही जोरदार पाऊस झाल्याने येथील नदीला पूर आला होता. दुपारपर्यंत पुलावरून पाणी वाहत असल्याने श्रीगोंदा- कर्जत रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती.

SCROLL FOR NEXT