अहमदनगर

डळमळीत डोलारा कसा सांभाळणार?

अमृता चौगुले

कैलास शिंदे

नेवासा पोलीस ठाणे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत प्रकाश झोतात येत असते. काही तरी कारण होऊनच येथील पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी होत आलेली आहे. आताही सव्वा लाखाचे प्रकरण होऊन पोलिस निरीक्षकांच्या बदलीचा सिलसिला झालेला आहे. आता नेवासा पोलिस ठाण्याची सूत्रे पुन्हा दुसर्‍यांदा विजय करे यांच्याकडे आलेली आहे.

नेवासा पोलिस ठाण्याचा सतत डळमळीत होणारा डोलारा सांभाळण्याचे आव्हान पोलिस निरीक्षक विजय करे यांच्यासमोर असणार आहे.
नेवासा तालुक्यात नेवाशासह सोनई व शनिशिंगणापूर अशी तीन पोलिस ठाणी आहेत. तीन पोलिस ठाणी असतानाही, तालुक्यात नेहमी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत आलेली आहे.

वेळोवेळी गंभीर घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सतत नाकीनऊ आलेली आहे. गोळीबार, दंगल सदृश परिस्थिती, मारामार्‍या, अपहरण अशा घटना वारंवार घडत असल्याने जिल्ह्याचे लक्ष नेवासा तालुक्याकडे वेधले जात आहे. त्यातल्या त्यात नेवासा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सतत कोणत्या ना कोणत्या घटना घडतच असतात.

पोलिसांच्या मारामार्‍या, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या ऑडिओ क्लिप, ठाण्याचा कलेक्टर कोण? यावरूनही पोलिस कर्मचार्‍यांत नेहमीच धुसफूस झालेल्या आहेत. त्यावरूनच ऑडिओ क्लिप सारखे प्रकार होऊन नेवासा पोलिस ठाणे वादग्रस्त ठरलेले आहे.
मध्यंतरी एका पोलिस कर्मचार्‍याच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमुळे पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांची बदली झाली.

त्यानंतर विजय करे यांना वाळू तस्करांच्या ऑडिओ क्लिपमुळे मुख्यालयात जावे लागले. त्योच्या जागेवर आलेल्या बाजीराव पोवार यांना सव्वा लाखाचे प्रकरण भोवले असल्याची चर्चा असल्याने, त्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले. आता नेवासा पोलिस ठाण्याच्या कारभाराची माहिती असणार्‍या विजय करे यांच्याकडेच पुन्हा या पोलिस ठाण्याची सूत्रे आलेली आहेत.

त्यांना दबदबा निर्माण करावा लागणार आहे. वाळू, दारू, मटका, जुगार, गुटखा आदी अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करतानाच शहरातील सुसाट वेगाने फिरणार्‍या दुचाकीस्वारांना, गावातील टारगट तरूणांना लगाम घालावा लागणार आहे. पोलिस कर्मचार्‍यांमधील कुरबुरीकडेही लक्ष द्यावे लागेल. पोलिस ठाण्यातील तपासी पथकाला (डी.बी.) गती देण्याचा कानमंत्रही विजय करे यांना द्यावा लागणार आहे. या सर्वांकडे लक्ष देऊनच येथील पोलिस ठाण्याचा डळमळीत झालेला डोलारा सांभाळण्याचे कसब त्यांना करावे लागणार आहे.

पोलिस ठाण्याची ओपीडी!
पोलिस निरीक्षक विजय करे यांनी यापूर्वी विविध गुन्ह्यांचा तपास लावलेला आहे. शेताच्या बांधावरचे प्रकरण, भावा-भावांमधील वाद सामंजस्याने सोडविलेले आहेत. पूर्वी सामान्यांना न्याय देण्यासाठी करे यांची पोलिस ठाण्याची सतत ओपीडी चालूच असायची. आताही अशीच पद्धत अवलंबतील, अशी अपेक्षा नेवासेकरांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT