अहमदनगर

श्रीगोंदा : शेतकर्‍यांचा सर्वच कांदा 2410 रुपयांप्रमाणे घ्या : राजेंद्र नागवडे

अमृता चौगुले

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शासनाने दोन लाख मेट्रिक टन नव्हे, शेतकर्‍यांचा 100 टक्के कांदा 2 हजार 410 रुपयांप्रमाणे कांदा खरेदी करावा, घोड, विसापूरचे आवर्तन चार दिवसात न सोडल्यास 31 ऑगस्ट रोजी पुणे येथील सिंचन भवनवर शेतकर्‍यांचा मोर्चा काढण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिला. काल बुधवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते, शेतकर्‍यांनी जनआंदोलन केले. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेला 40 टक्के कर रद्द करावा, घोड व विसापूरचे आवर्तन तातडीने सोडा, अशा मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार नीलेश वाघमारे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना देण्यात आले.

नागवडे या वेळी म्हणाले, घोड, विसापूर लाभक्षेत्रातील पिके जळून चालली आहेत, हे सरकार धरणाचे पाणी सोडत नाही. जर पाणी सोडले नाही, तर साखर कारखान्याचे अवघड होणार आहे. याकडे प्रथम पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे लक्ष वेधणार आहोत.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले, दोन लाख टन कांदा खरेदी करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्र सरकार शेतकर्‍यांना दर वर्षी सहा हजार देतात. दिवसाला 17 रुपये मिळतात. 17 रुपयांत एक मिसळ तरी येईल का? असा सवाल त्यांनी केला.

प्रास्ताविक नागवडे साखर कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी केले. या वेळी नगराध्यक्षा शुभांगी पोटे, संभाजी बोरुडे, अ‍ॅड. विठ्ठलराव काकडे, शिवाजी पाचपुते, मुकुंद सोनटक्के, कांतीलाल कोकाटे, दिलीप काकडे, चांगदेव पाचपुते, शहाजी गायकवाड, सचिन कदम यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धर्मनाथ काकडे यांनी केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT