भारतीय कुस्‍ती महासंघाला मोठा धक्‍का, ‘UWW’ने केले सदस्यत्व रद्द | पुढारी

भारतीय कुस्‍ती महासंघाला मोठा धक्‍का, 'UWW'ने केले सदस्यत्व रद्द

पुढारी वृत्तसेवा : मागील काही महिन्यांपासून विविध आरोपांमुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या भारतीय कुस्ती महासंघाला गुरुवारी मोठा धक्का बसला. जागतिक कुस्तीचे संचालन करणार्‍या युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अर्थात जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द केले आहे. निवडणूक प्रक्रिया वेळेवर न पार पाडल्यामुळे ही नामुश्की ओढवली आहे. या निर्णयामुळे आता जागतिक पातळीवर होणार्‍या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीगिरांना तिरंगा झेंड्याखाली खेळता येणार नाही. ते यूडब्ल्यूडब्ल्यूच्या झेंड्याखाली स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. याशिवाय कुस्तीपटूने सुवर्णपदक जिंकल्यास भारताचे राष्ट्रगीतही वाजणार नाही.

भारतीय कुस्ती महासंघाचे दैनंदिन व्यवहार सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेने स्थापन केलेल्या भूपेंद्रसिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील तदर्थ समितीद्वारे व्यवस्थापित केले जात होते.

मागील काही महिन्यांपासून भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआय) वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. भारतातील आघाडीच्या महिला कुस्तीपटूंनी तत्कालिन अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. त्यांच्यावर कारवाईसाठी दिल्लीत दीर्घ आंदोलनही केले. सर्व आरोप फेटाळत बृजभूषण शरण सिंह पदावर कायम राहिले. यामुळे हे आंदोलन चिघळले. अखेर केंद्र सरकारने कारवाईचे ठोस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. ऑलिम्पिक संघटनेने बृजभूषण यांचे अधिकार काढून घेऊन कुस्ती महासंघांचे कामकाज पाहण्यासाठी भूपेंद्रसिंग बाजवा यांच्या नेतृत्वाखाली 27 एप्रिल 2023 रोजी एक अस्थाई समिती स्थापन केली. तिच्याकडे निवडणुकीच्या आयोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली. समितीने निवडणुका घेण्यासाठी अनेक तारखा निश्चित केल्या; परंतु त्यांना न्यायालयीन आणि प्रशासकीय अडथळे येत गेले.

आधी भारतीय कुस्ती संघाच्या निवडणुका जून 2023 मध्ये होणार होत्या, परंतु विविध राज्य कुस्ती संघटनांच्या याचिकांमुळे, वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनी निवडणुकांवर बंदी घातली आणि निवडणुका लाींंबत गेल्या. भारतीय कुस्ती महासंघाच्या 15 पदांसाठी 12 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार होती, पण ऐन मतदानाच्या एक दिवस आधी या निवडणुकीला चंदीगड उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने आधीच स्पष्ट केले होते की, निवडणुका वेळेवर न घेतल्यास भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. त्यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या कुस्तीच्या जागतिक संघटनेने भारतीय कुस्ती संघटनेचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द केले आहे.

Back to top button