अहमदनगर; पुढारी वृत्त्तसेवा : पारनेर तालुक्याच्या नांदूर पठार येथील वारकरी भागा महाराज घोलप (वय 74) हे पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये गंभीरित्या जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी त्यांची विचारपूस केली असून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकार्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. वारकर्यांना मारहाण करणार्या पोलिसांना सरकारने तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने काळे यांनी केली आहे.
काळे म्हणाले की, नगर जिल्ह्यातील घोलप महाराजांना पोलिसांकडून झालेली मारहाण अमानुष प्रकारची आहे. गेली सलग 45 वर्षे ते पायी दिंडीतून वारीला जात आहेत. महाराष्ट्राला शेकडो वर्षांची संत परंपरा आहे. आळंदी ही संतांची भूमी आहे. संतांच्या भूमीमध्ये शिंदे, फडणवीस सरकारच्या आदेशावरून वारकर्यांवर लाठ्या उगारल्या गेल्या. या घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध करीत आहोत.
घोलप महाराज जिल्हा शासकीय रुग्णात असल्याची माहिती मिळताच आ. बाळासाहेब थोरात यांनी किरण काळे यांना त्यांची भेट घेण्याची सूचना केली. तसेच त्यांनी स्वतः देखील घोलप महाराज यांची विचारपूस केली असून त्यांच्या तब्येतीची परिस्थिती समजून घेतली आहे. काळे म्हणाले की, थोरात यांनी देखील घडल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून जखमींना योग्य ती वैद्यकीय मदत मिळणे बाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत.
यावेळी नांदूर पठारचे माजी सरपंच रवींद्र राजदेव, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल चुडीवाला, सचिव रतिलाल भंडारी, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला आदींसह काँग्रेस कार्यकर्ते होते. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी संबंधित वारकरी रुग्णाची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा