पुणे पालिकेच्या निविदाप्रक्रियेत अफरातफरीचे रॅकेट ! चार कर्मचारी निलंबित

पुणे पालिकेच्या निविदाप्रक्रियेत अफरातफरीचे रॅकेट ! चार कर्मचारी निलंबित

पांडुरंग सांडभोर : 

पुणे : महापालिकेच्या विकासकामांच्या निविदाप्रक्रियेत अफरातफर करून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कमी दराने निविदा भरून, खोटी कागदपत्रे तयार करून बिले मात्र जादा दराने काढण्याचे हे रॅकेट उजेडात आले आहे. याप्रकरणी चार कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, दोन ठेकेदारांनाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागात न केलेल्या कामांची संपूर्ण बोगस फाईल तयार करून बिले काढण्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता थेट निविदाप्रक्रियेच्या माध्यमातून महापालिकेला आर्थिक गंडा घालण्याचे एक रॅकेटच उजेडात आले आहे. घोले रोड उपायुक्त परिमंडळ क्र. 2 अंतर्गत कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झालेल्या विकासकामांच्या केवळ एक नव्हे, तर सहा कामांमध्ये निविदाप्रक्रियेत दरात तफावत करून तीन लाखांची अतिरिक्त रकमेची बिले सादर केली गेली आहेत. ही रक्कम तुलनेने कमी दिसत असली, तरी या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे नक्की प्रकरण ?
कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडून 2020-21 व 21-22 या आर्थिक वर्षांत विविध स्वरूपाच्या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यामधील सहा कामांमध्ये रवी नरेश कन्स्ट्रक्शन आणि मे. शिवसमर्थ कन्स्ट्रक्शन या ठेकेदारांनी निविदा कमी दराने भरून संबंधित कामे मिळविली. मात्र, बिले सादर करताना मात्र ती निविदेतील दरांप्रमाणे न भरता जास्त दराने सादर केली. (उदा. एका कामात संबंधित ठेकेदारांनी 40 टक्के इतक्या कमी दराने निविदा भरून कामे मिळविली. प्रत्यक्षात बिले मात्र 20 टक्के कमी दराच्या निविदा दाखवून बिले सादर केली.) त्यामुळे एकीकडे कमी दराने निविदा भरून कामेही मिळवणे आणि दुसरीकडे जादा दराची बिले सादर करून आर्थिक फायदाही मिळवणे हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशी केली फसवणूक
महापालिकेच्या विकासकामांच्या निविदा महाटेंडर या बेवसाईटवर ऑनलाईन पद्धतीने सादर होतात. ठेकेदारांना ऑनलाईन पद्धतीनेच त्यासाठी निविदा भराव्या लागतात. संबंधित ठेकेदाराने ऑनलाईन निविदा सादर करताना त्या 40 टक्के इतक्या कमी दराने भरून कामे मिळविली. मात्र, महापालिकेला बिले सादर करताना महाटेंडरची खोटी कागदपत्रे तयार करून, निविदा 20 टक्के इतक्या कमी दराच्या दाखवून बिले काढली.

प्रशासनाकडून तत्काळ कारवाई
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे तत्कालीन उपायुक्त यांच्या निदर्शनास हा गैरव्यवहार आला. त्यानंतर टेंडर विभागातील दोन कारकुनांसह अन्य दोन कर्मचार्‍यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. त्यांची चौकशी सुरू आहे. या अफरातफर प्रकरणात पालिका अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे की ठेकेदारांचेच हे
रॅकेट आहे, याची चौकशी केली जात आहे.

ठेकेदारांवरही कारवाई
ज्या ठेकेदारांनी ही अफरातफर केली आहे, त्यांना महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांची अनामत रक्कम व अतिरिक्त सुरक्षा रक्कमही दोन्ही जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

निविदाप्रक्रियेतील अफरातफरीनंतर वरिष्ठ अधिकार्‍यांकडे प्रकरण सादर केले आहे. त्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच संबंधित ठेकेदारांवरही लवकरच फौजदारी गुन्हा दाखल
करण्याची कारवाई केली जाईल.
                                                                 – नितीन उदास, उपायुक्त, मनपा 

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news