पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याच्या सुटीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाची घंटा आज गुरुवारी (दि. 15) वाजणार आहे. विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी शाळास्तरावर उत्साही नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी डोरेमॉन, छोटा भीम सज्ज राहणार आहेत. तर गुलाबपुष्प, गोड पदार्थ देऊन चिमुकल्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील शाळा सज्ज असल्याची माहिती विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे शैक्षणिक वर्ष 2022-23 हे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच संपले होते. त्यामुळे तब्बल पावणेदोन महिन्यांच्या दीर्घ सुटीनंतर शाळा पुन्हा भरत आहेत. उन्हाळी सुटी पडताना शाळा 13 जूनपासून सुरू होईल, असे परिपत्रक काढले होते; परंतु दरवर्षी शाळा भरण्याची एकच तारीख असावी या दृष्टीने यावर्षीपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जूनपासून करण्याचे निश्चित केले आहे. नवविद्यार्थ्यांचे शाळेत प्रथमच आगमन होणार असल्याने त्यांना शाळेची ओढ लागावी, शाळेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी पालक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. कोरोनाचे सावट पूर्णपणे संपलेले हे पहिलेच वर्ष असल्यामुळे विद्यार्थी, शाळा, शिक्षक, पालक यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.
5 लाखांवर विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
पहिली ते पाचवीच्या एकूण 2 लाख 72 हजार 35 आणि सहावी ते आठवीच्या 2 लाख 47 हजार 910 असे एकूण 5 लाख 19 हजार 945 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी प्रत्येक शाळास्तरावर पाठ्यपुस्तके पाठविल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. याचबरोबर नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करून शाळेच्या परिसरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री केली जाणार आहे.
पालिकेच्या शाळा आजपासून सुरू
उन्हाळी सुटीनंतर आजपासून शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. जिल्हा परिषद, महापालिका तसेच खासगी शाळांमधील पहिली ते दहावीचे वर्ग सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येणार्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. महापालिकेच्या शाळा आजपासून (गुरुवारी) सुरू होत आहेत.
हे ही वाचा :