अहमदनगर

नगर : सीना नदी पात्रातील वाळू उपशास खंडपीठाची बंदी

अमृता चौगुले

मिरजगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यातील मलठण ग्रामपंचायत हद्दीतील सीना नदी पात्रातील वाळू उपसा करण्यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बंदी घातली आहे. या निर्णयामुळे मलठण येथील ग्रामस्थांनी सुरू केलेल्या अभियानास मोठे पाठबळ मिळाल्याने पंचक्रोशीत आनंद व्यक्त होत आहे. मलठण हे गाव वाळूचे आगार म्हणून ओळखले जाते. सन 1978 पासून मलठण शिवारात वाळू उपसा व वाहतूक करण्यास मनाई आहे. तसा निर्णय येथील ग्रामस्थांनी एकमुखी घेतला आहे. राज्य सरकारने वाळू उपसा व विक्री संदर्भात नुकताच एक निर्णय घेतला आहे.

महसूल विभागाच्या वतीने मलठण शिवारातील सीना नदी पात्रातील वाळू उपसा करून त्याचा नागापूर येथे साठा करून तेथुन विक्री करण्यात येणार होती. या निर्णयाला विरोध करण्यासाठी मलठण ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव घेऊन या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले होते.

तसेच, मलठणच्या सरपंच सुभद्रा परमेश्वर भिसे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मलठण शिवारात असलेल्या सीना नदीतील वाळू उपसा करण्यास हरकत घेत याचिका दाखल केली होती. मलठण ग्रामपंचायत हद्दीतील सीना नदी पात्रातील वाळू उपसा करण्यास परवानगी दिल्यास येथील पर्यावरणास धोका निर्माण होईल. वाळूतील चुनखडी वर येऊन पाणी क्षारयुक्त होईल, जमिनी नापिकी होतील. येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून वाळूचे जतन केले आहे.

मलठण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अ‍ॅड. अभिजीत मोरे यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी सीना नदी पात्रातील मलठण शिवारातील वाळू उत्खनन करण्यास मनाई केली आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशास स्थगिती दिली आहे. या निकालाने मलठण येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

45 वर्षांपासून वाळू उपसा बंद
येथील वाळू उपसा गेल्या 45 वर्षांपासून बंद असल्याने कर्जत व जामखेड तालुक्यातील मलठण, तरडगाव, कवडगाव, गिरवली, चोंडी व निमगाव डाकू या गावांची पाणी पातळी वाढली आहे. हजारो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली आले आहे. हंगामी पिकांसह फळबागांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जैवविविधता वाढून निसर्गाचा समतोल साधला आहे. ग्रामस्थांचे जीवनमान उंचावले आहे.

पाणी समस्येवर उपाय म्हणून 1978 मध्ये आपण मलठण येथे वाळू उपसा बंदी अभियान राबविले. याला मलठणसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले आहे.
                                      – पोपटराव खोसे, अध्यक्ष विनोबा भावे प्रतिष्ठान, मलठण

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT