विजय सोनवणे
खेड(अहमदनगर) : तालुक्यातील पशुधनाला मोठ्या प्रमाणात लंम्पी आजाराची लागण झाल्याने पशुधन दगावले. याचा परिणाम दूध उत्पादनावर नाही, तर आर्थिक नियोजनावरही झाला. अनेक महिने जणावरांचे बाजार बंद ठेवावे लागले. हाहाकार माजवलेल्या लंम्पी रोगाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली. याच अनुषंगाने खेड (ता.कर्जत) येथील पशु वैद्यकीय दवाखान्याअंतर्गत या भागातील अनेक गावांना वाड्यावस्त्यांवर जाऊन लंम्पी स्किन डिसिज लसीकरण करण्याची मोहीम सुरू आहे.
खेडचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. विलास राऊत अधिकाधिक शेतकरी व पशुपालकांपर्यंत पोहचून हे काम अधिक प्रभाविपणे करत आहेत. सध्या खेड परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणार्या खेड, करमनवाडी, आखोनी, खैदान, वायसेवाडी, औटेवाडी, बाभुळगाव, शिंपोरा, मानेवाडी, करपडी, गणेशवाडी आदी वाड्यावस्त्यांवर पशुधनाचे काही अपवाद वगळता लसीकरण पूर्ण झाले आहे. जनावरांची काळजी घेण्यासाठी व उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क असली, तरी अनेक शेतकरी व पशुपालकांचा प्रतिसाद दिसत नाही.
पशुधन दगावू नये, एकामुळे अनेक जनावरांना रोगाची लागण होऊ नये, यासाठी अनेक माध्यमातून डॉ. विलास राऊत जनजागृती करत आहेत. असे असले तरी प्रशासनास सहकार्य न करणार्या, लसीकरणास विलंब करणार्या व स्वतः बरोबर इतरांचेही आरोग्य धोक्यात घालणार्या नागरिकांवर प्रशासनाने कारवाई करावी का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
या आगोदर उद्भवलेली परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून पशुपालकांनी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. पशु वैद्यकीय दवाखान्याला अनेक वर्षे वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने खेड परिसरातील हजारो पशुधनाचे आरोग्य रामभरोसे होते; मात्र सध्या अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. पशु वैद्यकीय सेवा, कृत्रिम रेतन, व्यंधत्व निवारण, जंत निर्मूलन, कीटक निर्मूलन तसेच विविध शासकीय योजणांची माहिती खेडचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. विलास राऊत यांच्याकडून मिळत आहे.
खेडच्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले असून, अनेक सुविधा मिळत आहेत. नागरिकांनी टाळाटाळ न करता अनेक योजणांचा लाभ घ्यावा.
– सचिन मोरे, माजी उपसरपंच, खेड
हेही वाचा