अहमदनगर

अहमदनगर-सोलापूर महामार्गावरील पुलांचे काम प्रगतिपथावर; निवडणुकीच्या मुहूर्तावर लोकार्पण?

अमृता चौगुले

रुईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर – सोलापूर महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुलांचे ही काम प्रगतीपथावर आहे. महामार्गावरील पुलांचे काम चालू असल्याने महामार्ग सुरू होण्यास विलंब होत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने काम जोमाने सुरू आहे. या मार्गावरील सर्वात मोठा पूल हा सीना नदीवरील आहे. सीना नदीवरील पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, मुरूम भराईचे काम सुरू आहे.

नगर-सोलापूर महामार्ग नगर शहरासह ग्रामीण भागातील विकासात भर पाडत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शहराच्या ठिकाणी कमी वेळेत जाण्यासाठी हा महामार्ग कामधेनु ठरणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी हा महामार्ग वेगवान ठरणार आहे. मार्गावरील पुलांवर दोन्ही बाजूंनी विजेची सोय करण्यात आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर लखलखाट होणार असून, नवीन वर्षात महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

नगर-सोलापूर मार्गाचा पहिला बाह्यवळण रस्ता रुईछत्तीशी येथून जात असल्याने वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेली वृक्षवेली बहरली असून, प्रवाशांना आकर्षण ठरत आहे. महामार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर लोकार्पण केले जाईल, अशी माहिती नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी दिली.

देवस्थाने महामार्गाच्या पल्ल्यामुळे प्रकाशझोतात

मांदळी, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर ही देवस्थाने महामार्गाच्या पल्ल्यामुळे प्रकाशझोतात येणार आहेत. पुढील वर्षी होणारी पंढरीची वारी याच मार्गावरून जाणार असल्याने वारकर्‍यांच्या पाऊलखुणा देखील महामार्गाचे वैभव वाढविणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT