नव्या विषयांनी गाजतेय पुरुषोत्तम करंडकची प्राथमिक फेरी | पुढारी

नव्या विषयांनी गाजतेय पुरुषोत्तम करंडकची प्राथमिक फेरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोणी एकांकिकेतून मांडलेली लेखकाच्या संघर्षाची कहाणी असो वा कोणी एकांकिकेतून सादर केलेली रहस्यकथा असो… तर कोणी सादर केलेली कृत्रिम पावसावर आधारित एकांकिका असो… अशा नव्या कोर्‍या विषयांवरील एकांकिकांनी सध्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी गाजत आहे. नव्या-जुन्यांचा संगम असलेल्या महाविद्यालयीन संघांचे उत्कृष्ट सादरीकरण आणि कलाकारांच्या सादरीकरणात दिसणारा आत्मविश्वास हे प्रेक्षकांची मने जिंकत आहेच. पण, एकांकिका पाहण्यासाठी फक्त पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षक गर्दी करत आहेत आणि दादही देत आहेत. यंदा करंडक पटकाविण्याची जिद्द घेऊन सर्वजण सादरीकरण करत आहेत.

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी गेल्या काही दिवसांपासून भरत नाट्य मंदिरात सुरू असून, स्पर्धेला यंदा तरुण प्रेक्षकांचाही दमदार प्रतिसाद मिळत आहे. महाविद्यालयीन संघांच्या एकांकिकांमध्ये नेपथ्यापासून ते सादरीकरणापर्यंत सगळ्यात नावीन्यता पाहायला मिळत आहे, तर वेगळ्या धाटणीचे विषय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. विशेष म्हणजे एकांकिकेतील उत्कृष्ट संवादावर प्रेक्षकही उत्स्फूर्त दाद देताना दिसत आहेत.

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकल महाराष्ट्रीय तंत्रज्ञान विद्यापीठाने ‘विळखा’ ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेतून मांडलेल्या रहस्यकथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. याबद्दल आयुष निकाळजे म्हणाला, आम्ही ‘विळखा’ या एकांकिकेतून रहस्य कथा मांडण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या ‘खेकडा’ या पुस्तकातील पावसातला पाहुणा या कथेवर आमची एकांकिका आधारित होती. आमच्या या वेगळ्या धाटणीच्या या एकांकिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. एकांकिकेतील टीममधील प्रत्येकाने उत्साहाने, आत्मविश्वासाने सादरीकरण केले आणि नव्या-जुन्या संगम असलेल्या आमच्या टीममधील प्रत्येकाची मेहनत दिसून आली.

पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने अमृतफळे ही एकांकिका सादर केली. याबद्दल विद्यार्थी प्रतिनिधी तेजस जगताप म्हणाला, आम्ही एकांकिकेतून एका लेखकाची काहणी मांडली. संघातील प्रत्येकाने मेहनत घेऊन सादरीकरण केले आणि प्रेक्षकांची दाद मिळाली. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी होणे प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण होता.

भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘या सुखांनो या’ ही एकांकिका सादर करत मने जिंकली. एकांकिकेबद्दल प्रथमेश बडदे म्हणाला, या एकांकिकेचे दिग्दर्शन माझ्यासह साई सगरी याने केले. 2008-09 साली राजा मराठे यांनी मांडलेल्या कृत्रिम पावसाच्या संकल्पनेवर ही एकांकिका आधारित होती. या वेगळ्या विषयाने प्रेक्षकांनाही थक्क केले. सादरीकरणात वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने खूप मेहनत घेतली. 30 ऑगस्टपर्यंत भरत नाट्य मंदिरात स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू राहणार आहे. सायंकाळी पाच वाजता नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाची मांदियाळी, एमसीसीची सिनेमा आणि एमईएस सीनिअर कॉलेजची थोडं तुझं थोडं माझं या एकांकिका सादर होणार आहेत.

हेही वाचा :

नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : वर्षभरात तीन हजार भटक्या मांजरींची नसबंदी

Back to top button