प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू : शिक्षणमंत्री दीपक केसरकर | पुढारी

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू : शिक्षणमंत्री दीपक केसरकर

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे आमदार नीलेश लंके यांनी लक्ष वेधून या प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. विविध प्रश्नांवर स्वतंत्र बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देऊ, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सध्या शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा प्रचंड बोजा पडत असल्यामुळे, त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेळ मिळत नाही. सध्या शिक्षकांकडे बीएलओचे काम सुपूर्द करण्यात आले असून, या कामातून शिक्षकांची मुक्तता करण्यात यावी.

नव्याने सुरू होत असलेल्या साक्षर योजनेसाठी सर्वेक्षक म्हणून शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या कामांतूनही शिक्षकांना वगळण्यात यावे. नवनवीन अ‍ॅप्सच्या माध्यमातून कामाचा प्रचंड भडीमार शिक्षकांवर होत असून, ही ऑनलाईन कामेही थांबविण्यात यावीत, अशी शिक्षकांची मागणी असल्याचे आमदार लंके यांनी मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले.

जिल्हा परिषदेमध्ये रिक्त केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी या पदांवर उच्च शैक्षणिक पात्रताधारक एम.एड. शिक्षकांना सामावून घेण्यात यावे. यासाठी 1967 चा शासन निर्णय दुरूस्त करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. विज्ञान पदवीधर शिक्षकांना बी. एसस्सी. पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळावी. बदलीची गरज असलेल्या शिक्षकांसाठी ऑनलाईन बदल्या करण्यात याव्यात.

शिक्षकांचे पगार दरमहा एक तारखेला करण्यात यावेत. शिक्षकांना मुख्यालयाची सक्ती करण्यात येऊ नये. शिक्षक भरती सुरू करावी, आदी मागण्या त्यांनी केल्या. शिक्षकांच्या प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी मंत्री केसरकर यांनी दिली. यावेळी अ‍ॅड. राहुल झावरे उपस्थित होते.

शिक्षिकेला न्यायासाठी आंदोलन

नेरूळ, नवी मुंबई येथील शिक्षिकेवर अन्याय करत संस्थेने सेवेतून कमी केले आहे. या शिक्षिकेवरील अन्याय दूर करण्याबाबत पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आलेली नाही. दहा दिवसांत संस्थाचालक व अधिकार्‍यांची बैठक घेऊन या शिक्षिकेस न्याय द्यावा. अन्यथा मंत्री केसरकर यांच्या दालनात आंदोलन करणार असल्याचे निवेदन आमदार लंके यांनी दिले.

हेही वाचा

पोलंडमधील प्राचीन दफनभूमीत सापडले चांदीचे दागिने

नव्या विषयांनी गाजतेय पुरुषोत्तम करंडकची प्राथमिक फेरी

स्टँडर्ड ग्लासपेक्षा दहापट मजबूत, ‘इको-फ्रेंडली’ काचेची निर्मिती

Back to top button