अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील धरणांत 34 हजार टीएमसी पाणी

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे भंडारदरा, निळवंडे, मुळा आणि आढळा या चार धरणांत आतापर्यंत तब्बल 34 हजार 402 दलघफू पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे नऊ धरणांत 40 हजार 130 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एकूण क्षमतेच्या तुलनेत जिल्ह्यातील धरणांत 78.55 टक्के पाणीसाठा आहे. आणखी 10 टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे. दरम्यान, कृष्णा खोर्‍यातील सीना, खैरी, मांडओहळ या मध्यम धरणांची पाणीपातळी अद्याप 30 टक्क्यांच्या आसपास आहे.

जिल्हाभरात सलग चार वर्षे सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सर्वच नऊ धरणेदेखील ओव्हर-फ्लो झाली होती. औरंगाबादचे जायकवाडी धरण देखील काठोकाठ भरले होते. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांचे पाणी जिल्ह्यातच उपयोगी पडले. यंदा मात्र, परिस्थिती अवघड झाली आहे.

धरणांच्या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असले तरी भंडारदरा, निळवंडे, मुळा व आढळा या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे 1 जून ते 23 ऑगस्ट या कालावधीत भंडारदरा धरणात 12 हजार 191, निळवंडे धरणात 9 हजार 675, मुळा धरणात 12 हजार 167 तर आढळा धरणात 369 दलघफू अशी 83 दिवसांत चार धरणांत एकूण 34 हजार 402 दलघफू पाण्याची आवक झाली आहे.

कृष्णा खोर्‍यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात म्हणावा असा पाऊस झाला नाही. त्यामुळे सीना धरण 27.13, खैरी 17.51 टक्के, विसापूर 5.77 टक्के, मांडओहळ व पारगाव घाटशीळ हे दोन्ही धरणे सरासरी आठ टक्के भरले आहेत. ही धरणे ओव्हरफ्लो होण्यासाठी तीन- चार दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

उपलब्ध पाणीसाठा (दलघफू)

भंडारदरा 10721, मुळा 2077, निळवंडे 6877, आढळा 906, मांडओहळ 29.82, घाटशिळ 33, सीना 651, खैरी 90.73, विसापूर 52.18.

गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेसात टीएमसी कमी

जिल्ह्यातील नऊ लहान-मोठ्या धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता 51 हजार 93 दलघफू इतकी आहे. आजमितीस या धरणांत एकूण 40 हजार 130 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एकूण क्षमतेच्या तुलनेत धरणांत 78.55 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच धरणांत 47 हजार 817 दलघफू इतका पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 7 हजार 681 दलघफू इतका पाणीसाठा कमी आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT