चंद्रपूर : जनविकास सेनेकडून जिल्हा रुग्णालय मुक्ती आंदोलन | पुढारी

चंद्रपूर : जनविकास सेनेकडून जिल्हा रुग्णालय मुक्ती आंदोलन

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत, असा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केलेला आहे. तसेच जिल्हा रुग्णालय व शंभर खाटांच्या प्रस्तावित महिला रुग्णालयाची इमारत वैद्यकीय महाविद्यालयापासून मुक्त करण्यासाठी आजपासून (दि.२३) शासकीय रुग्णालयासमोर जिल्हा रुग्णालय मुक्ती आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनस्थळी उपचाराअभावी मृत्यू झालेल्या परिचारिका सीमा मेश्राम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयापासून रुग्णालयाला मुक्ती मिळेपर्यंत लढा देण्याची प्रतिज्ञाही यावेळी शेकडो आंदोलनकर्त्यांनी घेतली.

वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत आहे. भोंगळ कारभारामुळे अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप जनविकास सेनेने केला आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय या मुळच्या विभागाला पुर्नहस्तांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी जनविकास सेनेकडून जिल्हा रुग्णालय मुक्ती आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात जनविकास महिला आघाडी अध्यक्ष मनीषा बोबडे व युवा आघाडी अध्यक्ष अक्षय येरगुडे यांचेसह अरूण येरगुडे, अशोक मुळे, नितीन बन्सोड, निर्मला नगराळे, हरिदास देवगडे, कुशाबराव कायरकर, गुलाबराव पुनवटकर, अमुल रामटेके, सुभाष फुलझेले, चंद्रमणी पाटील, वसंता जोशी, निखिल पोटदुखे, प्रवीण चौरे, सचिन भिलकर, शुभम चिंचोळकर व कार्यकर्ते सहभागी झाले.

शंभर खाटांच्या महिला रुग्णालयात चालतात वर्ग

केंद्र सरकारच्या भारतीय वैद्यकीय परिषदेकडून मंजुरी मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडण्यात आले. सन २०१५ मध्ये अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामध्ये तीन वर्षासाठी हस्तांतरण करार करून रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाला जोडण्यात आले. या कराराला २०१८ मध्ये तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. मागील आठ वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाने स्वतःचे रुग्णालय उभारले नाही. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांना आठ वर्षापासून रुग्णालय परत मिळाले नाही. शंभर खाटांचे प्रस्तावित महिला रुग्णालयाची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाची रामनगरमधील इमारत सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाने वर्ग चालविणे व प्रशासकीय कामासाठी आपल्या ताब्यात घेतली. अत्यंत गरज व शासनाची मंजुरी असतानाही शंभर खाटांचे महिला रुग्णालय सुरू झाले नाही.

जिल्हा रुग्णालय मुक्तीपर्यंत आंदोलन सुरू राहणार

वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत आहे. महाविद्यालयाच्या तावडीतून जिल्हा रुग्णालय तसेच प्रस्तावित महिला रुग्णालयाची इमारत मुक्त करणे हा जिल्हा रुग्णालय मुक्ती आंदोलनाचा हेतू आहे. मागणी मान्य होईपर्यंत विविध मार्गाने जिल्हा रुग्णालय मुक्ती आंदोलन सुरू राहणार आहे अशी माहिती जन विकास सेनेचे संस्थापक पप्पू देशमुख यांनी केले.

Back to top button