Latest

Lionel Messi : ‘मेस्सीला हात लावलास तर…’, मेक्सिकन बॉक्सरला टायसन फोडणार!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील मेक्सिको आणि अर्जेंटिना (Lionel Messi) यांच्यातील सामन्यानंतर सुरू झालेला जर्सीच्या विटंबनेचा वाद वाढतच चालला आहे. आता या प्रकरणात माजी दिग्गज बॉक्सिंगपटू माईक टायसनने उडी घेतली आहे. त्याने मेस्सीला धमकावणा-या मेक्सिकन बॉक्सरला निशाण्यावर घेत त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

मेक्सिको-अर्जेंटिना (Lionel Messi) यांच्यातील सामन्यात मेस्सीने महत्त्वपूर्ण गोल केला आणि त्याच्या संघाने हा सामना २-० गोल फरकाने जिंकला. या विजयानंतर अर्जेंटिनाच्या ड्रेसिंग रूममध्ये मेक्सिकोची जर्सी जमिनीवर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याचा दाखला देत मेक्सिकन चाहते मेस्सीवर चांगलेच भडकले आहेत. मेस्सीने विरोधी संघाचा आदर केला पाहिजे आणि त्याने मेक्सिकोच्या जर्सीबाबत जे केले आहे ते अपमानास्पद असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. मेक्सिकोच्या जर्सीने फरशी साफ केल्याचा आरोप मेस्सीवर होत असल्याने ऐन फिफा वर्ल्डकपमध्ये वातावरण तापले आहे.

मेक्सिकन बॉक्सर कॅनेलो अल्वारेझने ट्विटरवरून, 'मेस्सीने मेक्सिकन जर्सीचा वापर फरशी साफ करण्यासाठी केला आहे. त्याने केलेले हे वर्तन मेक्सिकन नागरीकांच्या अस्मितेचा अपमान करणारे आहे. आता त्याने माझ्यासमोर कधीही येऊ नये अशी देवाकडे प्रार्थना करावी,' अशी धमकी दिली असून 'मी अर्जेंटिनाचा जसा आदर करतो तसा मेस्सीने मेक्सिकोचा आदर केला पाहिजे,' अशी समजही दिली आहे.

सामना संपल्यानंतर मेस्सीने मेक्सिकन खेळाडूसोबत त्याची जर्सी खिलाडूवृत्तीने एक्सचेंज केली. त्यानंतर अर्जेटिनाचा संघ ड्रेसिंग रूममध्ये पोहचला. त्यावेळी शूज काढताना मेस्सीने मेक्सिकोची जर्सी जमीनीवर ठेवली. अशातच काहीवेळाने अनवधानाने त्याचा पाय या जर्सीवर पडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेक्सिकन चाहते चांगलेच भडकले. त्यातूनच मेक्सिकन बॉक्सरने मेस्सीला धमकी दिली. अखेर मेस्सीच्या समर्थनार्थ माजी दिग्गज बॉक्सर टायसन सह अर्जेंटिनाचा माजी खेळाडू सर्जियो अग्युरो मैदानात उतरला आहे.

कॅनेलोच्या ट्विटला उत्तर देताना सर्जियो अग्युरो म्हणाला, 'मिस्टर कॅनेलो, वाद वाढवण्यासाठी कारण शोधू नकोस. तुला सॉकरबद्दल काहीच माहिती नाही. ड्रेसिंग रूममध्ये, शर्ट घामाने भिजलेला असल्यामुळे बहुतेक वेळा तो काढला जातो आणि जमिनीवर ठेवला जातो.'

काय म्हणाला माईक टायसन…

माईक टायसन म्हणाला, 'कॅनेलो नावाच्या बॉस्करने मेस्सीला धमकी दिली आहे. जर त्याने मेस्सीला हात लावण्याची हिंमत केली तर, मला इतक्या वर्षांनंतर पुन्हा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरावे लागेल,' असे प्रत्युतर दिले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT