चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मुल तालुक्यातील एका भाजीपाला वाडीत साडेतीन वर्षाचे बिबट्याचे बछडे आढळून आले. वनविभागाने त्याला पकडून सूरक्षित ठिकाणी हलविले आहे. वाडीत हा बछडा दडून असल्याची घटना (गुरूवार) दुपारच्या सुमारास आढळून आली.
गुरूवारी मुल तालुक्यात दुपारी 3.30 वाजता चिचपल्ली रेंज मधील उथळपेठ या गावातील वामन किन्नाके यांच्या भाजीपाल्याचा वाडीत बिबट्याचा बछडा असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. या बाबत वनविभाग व संजीवन पर्यावरण संस्था, मूलच्या सदस्यांना माहिती देण्यात आली. वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले.
चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांनी बिबट्याच्या बछड्याला सुरक्षितपणे पकडून टी.टी.सी. चंद्रपुरला हलविण्यात आले आहे. या कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहाय्यक पी.डी खनके, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रभाकर धोटे, स्वप्नील आक्केवार, वनरक्षक पी.एस. मानकर, शीतल चौधरी व वनमजुर उपस्थित होते.