Latest

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ सोडणार नाही : नारायण राणे

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे आणि येथे आमचाच उमेदवार असेल. मतदारसंघ सोडणार नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला (शिंदे गट) दिला आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावरून महायुतीत चांगलीच ताणाताणी सुरू झाली आहे. बुधवारी मतदारसंघात दोन्ही पक्षांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी चालविली आहे. पक्षाने आदेश दिला तर स्वतः निवडणूक लढवणार आणि जिंकणार, असेही राणे म्हणाले.

संबंधित बातम्या 

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग -रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच आहे. येथून भाजपचाच उमेदवार निवडणूक लढवेल. मतदारसंघ सोडणार नाही. उमेदवार कोण असेल हे माहिती नाही. पण तो भाजपचाच असेल, असे राणे म्हणाले. तसेच पक्षाने आदेश दिल्यास आपण स्वतः येथून निवडणूक लढवू आणि विजयी होऊ, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बँका, आमदार आमचे आहेत. आमची शक्ती आहे. त्यामुळे मतदारसंघ कसा सोडणार, असा प्रश्नही राणे यांनी केला. रत्नागिरी-सिंधदुर्गवरून महायुतीतील जागावाटपाचा तिढा आहे. शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा ठोकला आहे.

'मातोश्री'वर जाताना प्रसाद घेऊनच जावे लागत होते

'मातोश्री'वर जाताना शिवसेना नेत्यांना प्रसाद घेऊनच जावे लागत होते. आम्हा सगळ्यांकडून पैसे घेतले तो काळा पैसा नव्हता का, असा प्रश्न राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. पदे आणि उमेदवार्‍या वाटण्याचे काम ठाकरेंनी केले. मतदारसंघ आम्हाला मिळाल्यास धनुष्यबाणाच्या चिन्हावर आमचा उमेदवार अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल, असे उदय सामंत यांनी म्हटले होते. तसेच दोन दिवसांत याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, असेही त्यांनी म्हटले होते. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राणे यांनी भाजपशिवाय सिंधुदुर्ग-रत्नागिरीत दुसरा उमेदवार नसल्याचे राणे म्हणाले. सामंत यांच्या उमेदवारीवरील दाव्याबाबत विचारले असता राणे यांनी हात जोडले.

मोदींवर टीका करण्याची त्यांची लायकी नाही; ठाकरेंना इशारा

दरम्यान, राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावरील सभेत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचाही राणे यांनी खरपूस समाचार घेतला. भ्रष्ट नेत्यांच्या अटकेविरोधात एकत्र जमलेल्या भ्रष्ट नेत्यांना पराभव दिसू लागल्यानेच मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. अशा लायकी नसलेल्यांना मतदारच निवडणुकीत तडीपार करतील. राजकीय उंची आणि बौद्धिक कुवत नसलेल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका करणे थांबवावे. अन्यथा भाजप कार्यकर्त्यांना त्यांची लीला दाखवावी लागेल, असा इशाराही राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिला.

कोरोना काळात गरिबांच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍यांना सुज्ञ मतदारच यावेळी घरी बसवतील, असेही राणे म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी टीका करताना मर्यादा पाळावी, असा इशाराही त्यांनी दिला. स्वतः राऊत हे निवडणुकांसोबत ठाकरेंसोबत राहणार नाहीत. त्यांच्यामुळेच शिवसेना संपत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर मॅच फिक्सिंगचा केलेल्या आरोपाचाही राणे यांनी समाचार घेतला.

तपास यंत्रणांच्या धाडीत काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीकडे शेकडो कोटींची रोकड मिळाली. अनेक घोटाळे समोर येत असताना भ्रष्ट मंत्र्यांवर होणार्‍या कायदेशीर कारवाई विरोधात ही मंडळी गळे काढत आहेत. कायद्यानुसार सर्व भ्रष्ट नेत्यांवर कारवाई होत असून गरीब सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचा पैसा पंतप्रधान मोदी मिळवून देतील, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT