Latest

सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज

रणजित गायकवाड

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत २४ टक्के कमी पाऊस पडला होता. मात्र सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा ११० टक्के पाऊस जास्त पडू शकतो, असे हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देशात आतापर्यंत मान्सूनचा पाऊस नऊ टक्के कमी पडला आहे. विशेषतः ऑगस्टमधील कमी पाऊस ही बाब चिंतेची ठरण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामातील पिकांना यामुळे फटका बसू शकतोच पण काही राज्यांत भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील निर्माण होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर सप्टेंबर सर्वत्र चांगला पाऊस होणे आवश्यक आहे. केवळ ऑगस्टमध्येच कमी पाऊस पडलेला आहे असे नाही तर मान्सूनच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जूनमध्येही ७ टक्के कमी पाऊस पडला होता.

सप्टेंबरमध्ये ईशान्स तसेच उत्तर भारत आणि दक्षिण भारतात काही ठिकाणी कमी पावसाचा अंदाज आहे, असे मोहपात्रा यांनी सांगितले. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस पडतो.

यंदा दोन महिने पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे संपूर्ण मान्सूनचा विचार केला तर सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

खाजगी संस्था स्कायमेटने याआधीच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविलेला आहे.

आतापर्यंतच्या पावसाचा विचार केला तर उत्तर पश्चिम भारतात सामान्यपेक्षा १३ टक्के कमी पाऊस पडला असून मध्य भारतात चौदा टक्के कमी पाऊस पडला आहे.

या भागात महाराष्ट्र, गोव्यासह मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. दक्षिण भारतात सरासरीच्या तुलनेत ५ टक्के जास्त पाऊस पडला आहे तर पूर्व आणि ईशान्य भारतात ८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

SCROLL FOR NEXT