Latest

विधवा प्रथा बंदीचा हेरवाड पॅटर्न राज्यभर राबवा : मुख्यमंत्री

backup backup

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय अलीकडेच घेतला होता. या पुरोगामी निर्णयाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेरवाड पॅटर्न राज्यभर राबविण्याचे आदेश बुधवारी एका पत्राद्वारे राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले.

याशिवाय हेरवाड ग्रामपंचायतीच्या विधवा प्रथा बंदी ठरावाचे रूपांतर शासकीय परिपत्रकात झाले आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास विभागाने आज या परिपत्रकाद्वारे केले.

आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढणे यासारख्या अनिष्ठ प्रथांचे पालन केले जाते. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि हेरवाडच्या ग्रामसभेने घेतला. प्रसारमाध्यमांनी या ठरावाचा सगळीकडे प्रसार केला. आता राज्य सरकारने विधवा प्रथा बंद व्हावी, यासाठी ग्रामपंचायतींनी काम करावे, असे आवाहन या परिपत्रकात केले आहे.

विधवा प्रथा निर्मूलनासाठी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यात यावी, यासाठी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आपापल्या स्तरावरील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करावे, तसेच ग्रामपंचायत हेरवाड यांनी केलेल्या ग्रामसभा ठरावाप्रमाणेच राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना ठराव घेणेबाबत प्रोत्साहीत करावे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

हेरवाडचे अनुकरण करा ः मुश्रीफ

विधवा महिलांना इतर महिलांप्रमाने सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा प्रथांचे पालन होत असल्याने प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी तसेच संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये, यासाठी ग्रामविकास विभाग पुढे सरसावला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी हेरवाडचे अनुकरण करून आदर्श ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT