Latest

मुंबईत वाढते कोरोना रुग्ण चिंताजनक, वेळीच पावले उचलायला हवीत : केंद्रीय मंत्री भारती पवार

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील वाढते कोरोना रुग्ण चिंताजनक बाब आहे. या परिस्थितीत वेळीच पावले उचलायला हवीत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केले. भारती पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

भारती पवार म्हणाल्या, ओमायक्रॉनबाबत सूचना दिल्या आहेत. केरळसारख्या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रत्येक राज्यावर केंद्राचं लक्ष आहे. महाराष्ट्रात आठवड्याभरात कोरोना संख्या वाढलेली दिसून येते. केंद्राने सर्व राज्यांना नियमावली दिलीय.

मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. कोरोना लशींचा पुरवठा केंद्राने केला आहे. काळजी घेतली तर कोरोनाचा प्रसार रोखता येईल. राज्य सरकारने थोडी गती वाढवावी. सतर्क राहून सर्वोतोपरी काळजी घ्यावी.

दरम्यान, दिल्‍लीत विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला. तेथील कोरोना संसर्ग दर ५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. शुक्रवारी सकाळी १० ते सोमवारीपहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. तसेच या काळात सर्व सरकारी कर्मचार्‍यांना घरातूनच कामकाज करावे लागेल.

दिल्‍ली आपत्तकालीन व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्‍या बैठकीत विकेंड कर्फ्यू (Weekend curfew ) लावण्‍याचा निर्णय घेण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले. दिल्‍लीत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढत असल्‍याने रात्रीची संचारबंदी लागू केली होती. आता कोरोना संसर्ग दर हा ५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक झाल्‍याने विकेंड कर्फ्यू निर्णय घेण्‍यात आल्‍याचे आला आहे. आता संसर्ग दर हा पुढील दोन दिवस पाच टक्‍क्‍यांपेक्षा अधिक राहिल्‍यास रेड अलर्ट लागू केला जाईल, असेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ होत असल्‍याने आज नायब राज्‍यपालांनी दिल्‍ली आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्‍या अधिकार्‍यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्‍थित रहाणार होते. मात्र या बैठकीपूर्वीच त्‍याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आल्‍याने ते घरातच विलगीकरणात राहत आहेत.

SCROLL FOR NEXT