अजमेरहून तलवारींचा साठा आणणाऱ्या चौघांना अटक, एक पसार | पुढारी

अजमेरहून तलवारींचा साठा आणणाऱ्या चौघांना अटक, एक पसार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा:  अजमेरहून १४ तलवारींचा साठा घेऊन येणार्‍या चौघांना चोपडा पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, चौकशीवेळी यातील एक जण जवळच्या जंगलात पळून गेला.

या संदर्भात माहिती अशी की, राजस्थानमधून चारचाकीतून तलवारींचा साठा आणला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांना मिळाली . या अनुषंगाने वनविभागाच्या सत्रासेन चेकपोस्टजवळ पोलिसांनी कारवाई केली. या चेकपोस्टवर पोलिस कर्मचारी तैनात होते. याच दरम्यान पोलिसांनी मध्य प्रदेश सीमेकडील अजमेरहून येणार्‍या एका ओमनी व्‍हॅनची (क्र.एम.एच.१९- सी.एफ. ४५७१) तपासणी केली. यातील चार जण तलवारींचा साठी घेऊन चाळीसगावकडे जात होते. पोलिस नाईक राकेश पाटील यांनी त्यांना अटक केली.

यात संशयित ओमनी चालक मुस्तफीन खान (वय २३), आरिफ इब्राहिम पिंजारी (वय २७), फहीमखान जमील खान (वय २८), सलमान अयुबखान (सर्व रा.चाळीसगाव) अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत. कारवाईदरम्यान संशयित मुश्रीफ खान (रा. भडगाव) हा जंगलात पसार झाल्याने पालिसांच्या हाती लागला नाही.

ही कारवाई पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली . या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर पाचवा फरारी आरोपीचा शोध देखील पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button