Latest

मनसे युवानेते अमित ठाकरे यांनी गाडीतून उतरून भाजप आमदार राहुल ढिकलेंशी साधला संवाद

backup backup

पंचवटी पुढारी वृत्तसेवा : भाजपाची जनआशीर्वाद यात्रा संपल्यानंतर आमदार राहुल ढिकले हे संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांशी गप्पा मारीत असताना तिथून जाताना राज ठाकरेंचे चिरंजीव तथा मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी ढिकलेंना पाहून गाडी थांबवली. खाली उतरून त्यांनी आ. ढिकले यांच्याशी काही वेळ संवाद साधला. या दोघांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सध्या भाजपाचे आमदार असलेले ढिकले हे पूर्वाश्रमीचे मनसे प्रदेश उपाध्यक्ष असल्याने या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

पंचवटीत शनिवारी (दि.२८) रात्री केंद्रीयमंत्री ना. डॉ. भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरा श्री काळाराम मंदिराबाहेर या यात्रेचा समारोप झाला. समारोपानंतर नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार ऍड. राहुल ढिकले हे त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते.

त्याचवेळी मनसेचे युवानेते राजपुत्र अमित ठाकरे व मनसेचे पदाधिकारी कारमधून मार्गक्रमण करीत होते. यावेळी त्यांनी पूर्वाश्रमीचे मनसे प्रदेश उपाध्यक्ष आणि सध्याचे भाजप आमदार राहुल ढिकले यांना पाहताच गाडीच्या खाली उतरून त्यांची विचारपूस केली. दोन मिनिटांच्या भेटीत एकमेकांची विचारपूस आणि काही विनोदी किस्सेही घडले.

आमदार ढिकले यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे मनसेच्या गोटात त्यांच्याबद्दल नाराजी होती. मात्र युवा नेते अमित ठाकरे यांनी मनमोकळेपणाने ढिकले यांच्याशी संवाद साधत आपल्या साध्या सरळ स्वभावाची झलक दाखवून दिली. दोन मिनिटांच्या गप्पागोष्टी केल्यानंतर अमित ठाकरे पुढील प्रवासाला मार्गस्थ झाले.

आ. ढिकलेंवर नाराज मनसे नेता कोण?

ठाकरे-ढिकले भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, यात ढिकले यांनी हसल्यावारी ठाकरे यांच्याकडे मनसे नेत्याची तक्रार केली. पक्ष सोडल्यापासून 'ही' व्यक्ती माझ्याशी बोलत नाही, फोनही उचलत नाहीत, त्यांना फोन उचलायला लावा, साहेबांनीसुद्धा मला एवढं लांब केलं नाही, असे ठाकरे यांना सांगितल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकू येते. मात्र आ. ढिकलेंवर नाराज असलेला आणि त्यांना लांब करणारा मनसेचा नेता कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हे ही वाचलत का :

मुलगी क्रिकेट खेळणार म्हणून चिडवले : पण उंचावले तिने नाव कोल्हापूरचे

SCROLL FOR NEXT