Latest

नवरात्र विशेष : पेडगावच्या रेणुका माता मंदिराची हलती दीपमाळ अन् बारवेतले ‘ते’ गूढ बुडबुडे

निलेश पोतदार

परभणी; पुढारी वृत्‍तसेवा : तालुक्यातील पेडगाव येथील रेणुका मातेचे देवस्थान हे भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी हलती दीपमाळ असून, बारव पाण्यातील बुडबुडे व ऋतुनुसार बदलणारा उबदार व थंड गाभारा मोठे आकर्षण असल्याचे पहावयास मिळते.

या विषयी अधिक माहिती अशी की, सातशे वर्षांपासून पेडगाव हे गाव बाजारपेठेचे ठिकाण आहे. यामुळे या गावाची पेठगाव या नावाने ओळख निर्माण झाली होती. महम्मद तुघलक याने देवगिरी काबीज केल्‍यानंतर त्‍याच्या फौजफाट्याच्या भीतीपोटी येथील मूळ रहिवाशी पळून गेले. नंतर पेडगाव जवळपास 300 वर्ष निर्मनुष्यच राहिले. अंदाजे 300 वर्षापूर्वी निजामी सरदार अजितशहा येथे शिकारीस आल्यानंतर त्यांना परिसर आवडल्यामुळे त्यांनी आपल्‍या सोबतच्या 4 देशमुखांना देशमुखी सनदा देत येथे वास्तव्य करून वस्ती विकसित करण्यास सांगितल्याचा उल्लेख आहे.

या परिसरात घनदाट जंगल व सर्वत्र भरपूर झाडे असल्याने देशमुखी सनदेत याचा उल्लेख पेडाचे गाव असा झाला. नंतर त्याचेच पेडगाव असे नामांतर झाले. गावात श्री रेणुका देवीचे मंदिर असून, आतील गाभार्‍यात देवीचा भव्य तांदळा आहे. गाभारा उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्याच्या थंडीत उबदार वाटतो. मंदिरसमोर एक उंच दीपमाळ आहे. तिची उंची 26 फूट असून बुडाचा परिघ 26 फूट आहे. मजबूत मातीविटांमध्ये बांधकाम केलेले आहे. त्यावर अनेक ठिकाणी सुंदर नक्षीकाम आढळते. दिपमाळेचे वैशिष्ट्य म्हणजे आजही वरील टोकावरून दीपमाळ हलवली तर ती खाली बुडापर्यंत हलत असल्याने हलती दिपमाळ म्हणून ती परिचित झाली आहे. काही वर्षांपर्यंत दीपमाळ हलविली की बाजूच्या बारवेतील पाण्यात बुडबुडे निघत होते, पण आता त्या जुन्या बारवेचे नूतनीकरण झाल्याने बुडबुडे दिसत नाहीत. पण दीपमाळ मात्र अजूनही हलताना दिसते.

या हलत्या मिनारसह पाण्यातील बुडबुड्याचे गूढ शोधण्याचा प्रयत्न त्यावेळी निजाम सरकारने व नंतर ब्रिटिशांनी अनेक वर्ष केला होता, पण त्याची उकल त्यांनाही झाली नाही. स्थापत्य कलेसह वास्तु कलेचा हा एक अनोखा नमुना असल्याचे दिसते. दरवर्षी विजया दशमीपर्यंत मोठा उत्सव होतो. 9 दिवस मंदिरात परड्या भरण्यासाठी महिलांची मोठी लगबग असते. नवरात्रीत मंदिर परिसरात श्रीमद् भागवत कथा, जागर, गोधळ, कीर्तन व अखंड हरिनाम सप्ताह होतात. महिला व बालकांसाठी विविध स्पर्धाही आयोजित केल्‍या जातात. नवरात्रीत गावातील बाई-लेकी माहेरी मातेच्या दर्शनाला आवर्जून येतात. कामानिमित्त बाहेर गेलेले गावातील नागरिक नवरात्रीत देवीच्या दर्शनाला आवर्जुन पेडगावला येतात.

हेही वाचा :   

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT